Join us

महाराष्ट्र निवडणूक 2019: शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून देवरा-निरुपम यांच्यात जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 05:43 IST

राज्यात सत्ता स्थापनेवरून निर्माण झालेल्या पेचप्रसंगात विविध समीकरणे आणि दावे केले जात आहेत.

- गौरीशंकर घाळे मुंबई : राज्यात सत्ता स्थापनेवरून निर्माण झालेल्या पेचप्रसंगात विविध समीकरणे आणि दावे केले जात आहेत. मात्र मुंबई काँग्रेसमधील नेते एकमेकांविरोधात भूमिका घेण्याची संधी सोडत नसल्याची बाब मात्र समोर आली आहे. शिवसेनेच्या पाठिंब्याने काँग्रेस, राष्ट्रवादीने सत्तास्थापनेसाठी पुढाकार घ्यावा, या मिलिंद देवरा यांचा फॉर्म्युला संजय निरूपम यांनी २४ तासात निरर्थक ठरवला आहे.मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी शनिवारी काँग्रेस आघाडीने सत्ता स्थापनेसाठी पुढाकार घ्यावा अशी भूमिका मांडली होती. आघाडीचे संख्याबळ शिवसेनेपेक्षा जास्त आहे. तेंव्हा अपक्ष आणि इतरांचा विशेषत: समविचारी मंडळींनी पाठिंब्याने सरकार बनवावे, असे विधान देवरा यांनी केले होते. काही अटींवर शिवसेनेचा पाठिंबा घेण्याचेही त्यांनी सुचविले होते. काँग्रेसने आपली विचारधारा आणि मुल्यांशी तडजोड न करता निर्णय घ्यावा. मुंबई महापालिकेसह विविध स्थानिक स्वराज संस्थां आणि केंद्र सरकारमध्ये भाजपसोबत असलेली युती शिवसेनेने तोडावी. शिवसेनेला एकावेळी दोन ठिकाणी घरोबा करता येणार नाही, असे देवरा म्हणाले होते. काँग्रेस हिताचे दावे करत देवरा आणि निरूपम यांच्यातच जुंपल्याचे दिसत आहे. देवरा विरुद्ध निरूपम हा वाद काँग्रेससाठी नवीन नाही. मात्र, राज्यातील पेचप्रसंगावरून मुंबई काँग्रेसमधील नेत्यांनी एकमेकांविरोधात भूमिका घेण्याची संधी सोडली नसल्याचे समोर आले आहे.निरूपम यांनी तर शिवसेनेसोबत कसल्याही प्रकारची आघाडी करणे काँग्रेस पक्षासाठी अनर्थकारी असल्याचे म्हटले आहे. शिवाय, सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार बनणे ही केवळ कल्पनाच ठरणार आहे. आघाडीकडे संख्याबळच नाही, हे सांगायलाही निरूपम विसरले नाहीत.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019शिवसेनाकाँग्रेससंजय निरुपम