भाजपच्या धक्कातंत्राने बदलणार मुंबईची राजकीय समीकरणे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 06:54 AM2019-10-05T06:54:14+5:302019-10-05T06:54:38+5:30

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यामुळे चर्चेत आलेली वरळीची लढत आणि भाजप श्रेष्ठींनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह प्रकाश मेहता, राज पुरोहित, सरदार तारासिंग यांना दिलेल्या डच्चूमुळे मुंबईतील राजकीय वर्तुळात घमासान सुरू आहे.

 Maharashtra Election 2019 : BJP's push to change Mumbai's political equation | भाजपच्या धक्कातंत्राने बदलणार मुंबईची राजकीय समीकरणे

भाजपच्या धक्कातंत्राने बदलणार मुंबईची राजकीय समीकरणे

Next

मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यामुळे चर्चेत आलेली वरळीची लढत आणि भाजप श्रेष्ठींनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह प्रकाश मेहता, राज पुरोहित, सरदार तारासिंग यांना दिलेल्या डच्चूमुळे मुंबईतील राजकीय वर्तुळात घमासान सुरू आहे. तावडे यांची उमेदवारी नाकारण्याच्या भाजप श्रेष्ठींच्या निर्णयामुळे मुंबईतील राजकीय समीकरणेच बदलली आहेत. शिवाय, तृप्ती सावंत यांनी वांद्रे पूर्वेत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मातोश्रीच्या दारातच बंडखोरीचे लोण पोहोचले.
शुक्रवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. दिवसअखेर मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांसाठी ४७९ अर्ज दाखल झाले. बंडाळीच्या भीतीने सर्वच पक्षांनी उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यास विलंब केला. आधी ए/बी फॉर्म वाटायचे आणि त्यानंतर अंदाज घेत घेत नावांची घोषणा करण्याचे नवेधोरण यंदा राजकीय पक्षांनी वापरले. तावडे व प्रकाश मेहता यांच्या समर्थकांनी राडाच घातला. मेहतांच्या जागी भाजपने पराग शहांना उमेदवारी दिल्याने शहांच्या गाडीची तोडफोड केली, तर तावडे समर्थकांनी बोरीवलीत भाजप उमेदवार सुनील राणेंविरुद्ध निदर्शने केली. वांद्रे पूर्वेत डावलण्यात आल्याने आमदार तृप्ती सावंत यांनी बंडाचे निशाण फडकावले. येत्या तीन दिवसांत सर्व बंडखोरांच्या मनधरणीचे आव्हान नेत्यांसमोर असणार आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादीमधील गटबाजी सुरूच आहे. समर्थकांना डावलल्याने नाराज झालेले काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी पक्षावर दुगाण्या झाडत प्रचारापासून लांब राहणार असल्याचे जाहीर केले. पक्षीय स्तरावर कोणतीच यंत्रणा कार्यरत नसल्याने उमेदवारांना स्वत:च्याच जीवावर निवडणूक लढवावी लागेल. निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याच्या आधी सचिन अहिर आणि आज संजय दिना पाटील या दोन दिग्गज राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने आधीच तोळामासा असलेल्या राष्ट्रवादीच्या अडचणी वाढल्या आहेत. मनसे, वंचित आघाडी, सपा, एमआयएमनेही उमेदवार मैदानात उतरवले असले तरी निवडक अपवाद वगळता मुंबईत युती विरुद्ध आघाडी अशीच लढत होण्याची शक्यता आहे.

Web Title:  Maharashtra Election 2019 : BJP's push to change Mumbai's political equation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.