Join us  

Maharashtra Election 2019: 'आदित्य माझ्या मुलाप्रमाणेच; त्याला वाटत असेल निवडणूक लढवावी तर त्यात गैर काय?'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 11:51 AM

काश्मीर हा भारताचाच भाग आहे, कलम 370 काढलं त्याचं अभिनंदन आहे. त्याठिकाणी परिस्थिती सुधारा, विकास करा पण याचा महाराष्ट्राचा काय संबंध आहे?

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच आदित्य ठाकरे यांच्या निवडणूक लढविण्यावर भाष्य केलं आहे. आदित्य ठाकरे असो अमित ठाकरे जर त्यांना वाटत असेल निवडणूक लढवावी तर त्यांना नाही का म्हणायचं? बाळासाहेब ठाकरे हे व्यंगचित्रकार होते. बाळासाहेबांनी कधीही त्यांचं म्हणणं उद्धव आणि माझ्यावर लादलं नाही. जर आमच्यावर असे संस्कार असतील तर आम्ही मुलांना वाटत असेल तर निवडणूक लढवावी तर त्यात गैर नाही अशा शब्दात राज ठाकरेंनी आदित्यच्या निवडणुकीवर भाष्य केलं आहे.

एका हिंदी चॅनेलवर मुलाखत देताना राज ठाकरे म्हणाले की, गेल्या 5 ते 10 वर्षात सरकारला विरोधी पक्ष आम्हीच रस्त्यावर उतरून विरोध केला होता. त्यामुळे आमच्यावर इतक्या केसेस पडल्या आहेत? त्यामुळे आम्हाला विधानसभेत विरोधी पक्ष म्हणून काम करायचा आहे. माझ्याकडे पर्याय नव्हता असं नाही, मी निवडणूक लढविली नसती, देशाची स्थिती, राज्याची स्थिती आर्थिक डबघाईला आली आहे. म्हणून विरोधी पक्षाची भूमिका घेणं हे हिंमतीचं आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच मी 104 ठिकाणी जागा लढवित असेल आणि मी सत्ता मागत असेन तर ते हास्यास्पद असेल. काश्मीर हा भारताचाच भाग आहे, कलम 370 काढलं त्याचं अभिनंदन आहे. त्याठिकाणी परिस्थिती सुधारा, विकास करा पण याचा महाराष्ट्राचा काय संबंध आहे? महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या झाल्या त्याच्यावर का बोलत नाही. बेरोजगारी, बँकेतील पैसे बुडतायेत, व्यापारांचे नुकसान झालं आहे असं असताना कलम 370 चा महाराष्ट्राच्या निवडणुकीत काय संबंध आहे? असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला.

दरम्यान, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले की, शरद पवार आणि आमच्यात कधीही एकत्र येऊन निवडणुका लढवाव्यात असं ठरलं नाही. महाराष्ट्राची संस्कृती आहे विरोधी पक्ष असो वा सत्ताधारी राजकीय विरोध असतील तर एकमेकांबद्दल वैयक्तिक विरोध कधीच नसतो. भाजपा खासदार शरद पवारांच्या घरी येतात म्हणून असं नाही बोलू शकत की भाजपा राष्ट्रवादीसोबत जातेय. ही महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आहे असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं. 

टॅग्स :राज ठाकरेमनसेशिवसेनाआदित्य ठाकरेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019वरळी