Maharashtra Election 2019: राज्यात ६१%

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 05:36 AM2019-10-22T05:36:11+5:302019-10-22T06:19:19+5:30

Maharashtra Election 2019: चौदाव्या विधानसभेसाठी सोमवारी राज्यात सरासरी अंदाजे ६१ टक्के मतदान झाले. ही सायंकाळी ६ पर्यंतच्या मतदानाची आकडेवारी आहे.

Maharashtra Election 2019: 61% in the state | Maharashtra Election 2019: राज्यात ६१%

Maharashtra Election 2019: राज्यात ६१%

Next

मुंबई : चौदाव्या विधानसभेसाठी सोमवारी राज्यात सरासरी अंदाजे ६१ टक्के मतदान झाले. ही सायंकाळी ६ पर्यंतच्या मतदानाची आकडेवारी आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी मतदानावर परिणाम झाला. तरीही मतदारांनी उत्साह टिकवला. पाच वर्षांपूर्वी म्हणजे २0१४ साली विधानसभेसाठी ६३ टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. मतमोजणी गुरूवार, २४ ऑक्टोबर रोजी होणार असून, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मतदानाच्या टक्केवारीबाबत ग्रामीण महाराष्ट्राने शहरी भागाला मागे टाकले. काही ठिकाणी हिंसाचाराच्या तुरळक घटना घडल्या. पावसाची तमा न बाळगता मतदान कर्मचाऱ्यांनी चोख कामगिरी बजावली. काही ठिकाणी वादावादी, हाणामारी व भांडणे असे प्रकार झाले. मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्याने मतदानावर परिणाम झाला नाही.शहरात तसेच ग्रामीण भागांमध्येही दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढला. सर्व मतादान केंद्रांवर दुपारनंतर मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्याचे दिसून आले. लोकसभा निवडणुकीसारखा उत्साह मात्र दिसून आला नाही.

काही मतदारसंघांमध्ये दोन उमेदवारांचे समर्थक आमनेसामने आल्याने राडा झाला. जामखेडमध्ये (जि.अहमदनगर) भाजपचे उमेदवार आणि मंत्री राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. जळगाव ग्रामीणमध्ये शिवसेनेचे उमेदवार राज्यमंत्री गुलाबराव पाटील आणि भाजपचे बंडखोर चंद्रशेखर अत्तरदे यांच्या समर्थकांत हाणामारीची घटना घडली. शिवसेना-भाजप कार्यकर्ते भिडले. पाटील यांचा मुलगा आणि २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. वरुड-मोर्शीमध्ये (अमरावती) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार यांचे वाहन पेटविण्यात आले आणि गोळीबार झाल्याची तक्रार त्यांनी केली.

म्हाडामध्ये राष्ट्रवादीचे संजय शिंदे आणि अपक्ष नारायण पाटील यांचे समर्थक भिडले. दोन निवडणूक कर्मचाऱ्यांना रविवारी प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल केले, मात्र सोमवारी त्यांचा मृत्यू झाला. खामगाव (बुलडाणा) येथे विरोधी उमेदवाराने मतदान केंद्र बळकावण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार काँग्रेस आघाडीचे उमेदवार ज्ञानेश्वर पाटील यांनी केली. मात्र, उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. अमरावती महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश मार्डीकर यांच्या वाहनातून काही रोख व प्रचारपत्रके पोलिसांनी जप्त केली.

 

Web Title: Maharashtra Election 2019: 61% in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.