विरोधक अविश्वास प्रस्तावावर तोंडावर आपटताय; नागरिकांचा PM मोदींवर विश्वास, CM शिंदेंचं ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 12:35 PM2023-08-10T12:35:25+5:302023-08-10T12:43:54+5:30

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत विरोधकांवर निशाणा साधला आहे.

Maharashtra CM Eknath Shinde has tweeted about the opposition's no-confidence motion against the Modi government | विरोधक अविश्वास प्रस्तावावर तोंडावर आपटताय; नागरिकांचा PM मोदींवर विश्वास, CM शिंदेंचं ट्विट

विरोधक अविश्वास प्रस्तावावर तोंडावर आपटताय; नागरिकांचा PM मोदींवर विश्वास, CM शिंदेंचं ट्विट

googlenewsNext

मुंबई/नवी दिल्ली: लोकसभेत आज अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी चार वाजता अविश्वास प्रस्तावावर उत्तर देणार आहेत. मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत ८ ऑगस्टपासून चर्चा सुरु झाली. काँग्रेसचे गौरव गोगोई यांनी चर्चेला सुरुवात करताना विरोधकांचा अजेंडा मणिपूर असेल, असं स्पष्ट केलं होतं. तर काल राहुल गांधी यांनी मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरुन भाजपा आणि पंतप्रधानांवर आक्रमकपणे हल्लाबोल केला. 

काँग्रेसच्या अविश्वास प्रस्तावाला प्रत्युत्तर देताना गृहमंत्री अमित शाह यांनी जोरदार युक्तिवाद केला. आजही दोन्ही बाजूचे खासदार अविश्वास ठरावावरील चर्चेत सहभागी होणार आहेत. शेवटी, नरेंद्र मोदी अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देतील. मात्र याआधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत विरोधकांवर निशाणा साधला आहे. देशभरात विश्वास गमावलेल्या विरोधी पक्षाने संसदेमध्ये अविश्वास ठराव मांडलाय. खरं तर या ठरावावर चर्चा घडवून विरोधक स्वतःचेच ‘वस्त्रहरण’ करून घेत असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. 

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास आणि सुधारणांचा धडाका लावलेला आहे. त्यामुळे विरोधकांच्या छातीत धडकी भरली आहे. कॉंग्रेसच्या ५५-६० वर्षांच्या कालखंडात जेवढी विकासकामे झाली नाहीत, त्यापेक्षा अधिक विकास गेल्या ९ वर्षांत झाला आहे. जगभरात पंतप्रधानांच्या नेतृत्वाला जी मान्यता मिळत आहे, ती पाहून विरोधकांचा जळफळाट झाला आहे, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली. 

देशातील जनतेने विरोधकांवर वारंवार अविश्वास दाखवलाय. २०१४ आणि २०१९ मध्ये सामान्य नागरिकांचा नरेंद्र मोदी यांच्यावरील प्रगाढ विश्वास दिसून आला. २०२४ साली तो वृद्धिंगत होईल, याबाबत कुणाच्याही मनात शंका नाही. भारताच्या नागरिकांना आता फक्त सर्वांगीण प्रगती आणि आर्थिक विकास हवा आहे. एकमेकांचे हात हाती घेऊन ऐक्याच्या घोषणा देणारे आणि पायात पाय घालून पाडण्याची संधी शोधणारे विरोधक आता कालबाह्य झाले आहेत. ते अविश्वास ठरावावर तोंडावर कसे आपटतात, हे गेल्या दोन दिवसांपासून सारा देश पाहतोय. पंतप्रधानांचे आणि एनडीएच्या घटक पक्षांचे स्थान या चर्चेनंतर अधिक बळकट होईल, यात मला तीळमात्र शंका वाटत नसल्याचं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. 


 

Web Title: Maharashtra CM Eknath Shinde has tweeted about the opposition's no-confidence motion against the Modi government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.