Join us  

Maharashtra CM: बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेऊ शकत नाही त्यांच्याबाबत काय बोलणार?; शिवसेनेला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 3:26 PM

Maharashtra News: तसेच विरोधात बसायचं होतं मग खुर्चीसाठी मॅच फिक्सिंग कोणी केली. शिवसेना कोणाच्या इशाऱ्यावर वागत होती?

नवी दिल्ली - राज्यातील सत्तास्थापनेबाबत भाजपा आणि अजित पवार यांच्या समर्थकाच्या एका गटाने सत्तास्थापनेचा दावा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शपथ दिली. सत्तेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर बंद करावा. शिवसेनेनं ती भाषा बोलू नये. बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेऊ शकत नाही त्यांच्याबाबत काय बोलणार? अशा शब्दात भाजपा नेते रवीशकंर प्रसाद यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. 

याबाबत बोलताना रवीशंकर प्रसाद म्हणाले की, ज्या शब्दांचा वापर शिवसेना नेत्यांनी पंतप्रधान, गृहमंत्री यांच्याविरोधात केला त्याबद्दल आम्हाला खंत आहे. स्वार्थासाठी शिवसेनेनं युती तोडली. बाळासाहेबांचा काँग्रेसविरोध प्रामाणिक अन् सर्वश्रूत होता, मात्र शिवसेनेला त्याचा विसर पडला. निकाल हा भाजपाचा नैतिक आणि राजकीय विजय होता असं त्यांनी सांगितले. 

 

तसेच विरोधात बसायचं होतं मग खुर्चीसाठी मॅच फिक्सिंग कोणी केली. शिवसेना कोणाच्या इशाऱ्यावर वागत होती? महाविकासआघाडीने एकदा तरी सत्तेचा दावा राज्यपालांकडे केला का? असा सवाल भाजपा नेते रवीशंकर प्रसाद यांनी करत भाजपा आणि अजित पवार यांचा गट एकत्र येत सत्तेचा दावा केला. नवीन युती स्थिर सरकार देणार आहे असा दावाही त्यांनी केला. 

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्याकडे बहुमत होतं मग त्यांनी राज्यपालांकडे दावा का केला नाही? अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत, भाजपा विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस आहेत त्यामुळे दोन्ही पक्षाच्या विधिमंडळ नेत्यांनी राज्यपालांकडे आमदारांच्या सहीचं पत्र दिलं आहे. तांत्रिकदृष्ट्या हे सगळं कायदेशीर झालं आहे. विधिमंडळात आम्ही बहुमत सिद्ध करु असंही भाजपा नेते रवीशंकर प्रसाद यांनी सांगितले. 

काही वेळापूर्वी शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत अजित पवारांविरोधात कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, आमच्याकडे बहुमतासाठी १६९ आमदारांचा पाठिंबा आहे. सकाळी साडेसहा राज्यपाल इतका मोठा निर्णय घेतात हे आम्ही पहिल्यांदा पाहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे काही सदस्य अजित पवारांसोबत गेले असं सांगण्यात आलं. मात्र हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचा विधिमंडळ सदस्य असो वा कार्यकर्ता तो भाजपासोबत सत्ता बनविण्यासाठी तयार नाही अशा शब्दात त्यांनी आपली भावना व्यक्त केली आहे.  

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसशिवसेनाबाळासाहेब ठाकरेरविशंकर प्रसादकाँग्रेसमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019