Join us

Maharashtra Cabinet Expansion : उद्या किंवा परवा जाहीर होणार नवनिर्वाचित मंत्र्यांचे खातेवाटप, उद्धव ठाकरेंचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 18:23 IST

नव्याने शपथ घेतलेल्या मंत्र्यांच्या खातेवाटपाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माहिती दिली आहे.

मुंबई - महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन सुमारे महिनाभरानंतर या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. दरम्यान, नव्याने शपथ घेतलेल्या मंत्र्यांच्या खातेवाटपाबाबत मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी माहिती दिली आहे. नवनिर्वाचित मंत्र्यांमध्ये पक्षाप्रमाणे खातेवाटप झाले आहे. आता त्याबाबतची माहिती उद्या किंवा परवा देऊ, असे उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेटच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले.

महाविकास आघाडीच्या सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर 34 व्या दिवशी झाला. या विस्तारात आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांच्या मिळून एकूण ३६ नव्या मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. शपथविधीनंतर सर्व मंत्र्यांना खातेवाटप होईल, अशी अपेक्षा होती. मात्र आज खातेवाटप जाहीर झालेले नाही. 

दरम्यान, मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर कॅबिनेटची पहिली बैठक झाली. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी नवनिर्वाचित मंत्र्यांच्या खातेवाटपाबाबत विचारणा केली असता उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, ''नवनिर्वाचित मंत्र्यांमध्ये त्यांच्या पक्षाप्रमाणे खातेवाटप झाले आहे. मात्र त्याबाबतची माहिती उद्या किंवा परवा दिली जाईल. 

  आजच्या शपथविधी वेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधु सुनील राऊत हे अनुपस्थित होते. त्यामुळे सुनिल राऊत यांना मंत्रिपद न मिळाल्याने राऊत बंधू नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाली आहे. त्याबाबत विचारले असता, मंत्रिमंडळ विस्तारावेळी कुणी दिसले नाहीत, म्हणजे ते नाराज आहेत, असे म्हणता येणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

टॅग्स :उद्धव ठाकरेमुख्यमंत्रीमहाराष्ट्र सरकारमंत्रिमंडळ विस्तार