Maharashtra Budget 2025 ( Marathi News ) : अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधिमंडळात अर्थसंकल्प सादर केला. अजित पवार यांनी शेतकरी, महिला तसेच अन्य क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा केल्या. तसेच यापुढे आता ३ ऑक्टोंबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिन म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर येथे अभिजात मराठी भाषेच्या संशोधन व अध्ययनासाठी उच्च दर्जाचे संशोधन केंद्र तसेच अनुवाद अकादमी स्थापित करण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
विधिमंडळामध्ये बोलताना अजित पवार म्हणाले, मायमराठीस केंद्रीय मंत्रिमंडळाच्या दि. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या बैठकीत अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल राज्यातील जनतेच्या आणि जगभरातील मराठी भाषिकांच्यावतीने मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी महोदयांचे मन:पूर्वक आभार मानतो. यापुढे दरवर्षी ३ ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिन, तर ३ ते ९ ऑक्टोबरदरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येईल, असंही अजित पवार म्हणाले.
मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर येथे अभिजात मराठी भाषेच्या संशोधन व अध्ययनासाठी उच्च दर्जाचे संशोधन केंद्र तसेच अनुवाद अकादमी स्थापित करण्यात येणार आहे.
उल्लेखनीय कामगिरीसाठी पुरस्कार सुरू करणार
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून अभिजात मराठी भाषाविषयक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. मराठी भाषेच्या संशोधनातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पुरस्कार सुरु करण्यात येणार आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.