Maharashtra Budget 2021: महिलेच्या नावानं घर घेतल्यास 'स्टॅम्प ड्युटी'त सूट अन् विद्यार्थिनींना मोफत बस प्रवास; महिला दिनी अर्थमंत्र्यांचं गिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 15:20 IST2021-03-08T15:18:26+5:302021-03-08T15:20:31+5:30
Maharashtra Budget 2021 Live : अजित पवार (Ajit Pawar) यांनी महिला दिनाचं औचित्य साधून (Women's Day) राज्यातील महिलांना मोठं गिफ्ट दिलं आहे.

Maharashtra Budget 2021: महिलेच्या नावानं घर घेतल्यास 'स्टॅम्प ड्युटी'त सूट अन् विद्यार्थिनींना मोफत बस प्रवास; महिला दिनी अर्थमंत्र्यांचं गिफ्ट
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून अजित पवार यांनी राज्यातील महिलांना मोठं गिफ्ट दिलं आहे. राज्यात राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील कोणतेही कुटुंब घर विकत घेईल तेव्हा घरातील महिलेच्या नावानं घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात (स्टॅम्प ड्युटी) एका टक्क्याची सूट दिली जाणार आहे. या योजनेची सविस्तर माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार असून याची अंमलबजावणी १ एप्रिल २०२१ पासून करण्यात येणार असल्याचं अजित पवार यांनी जाहीर केलं आहे. (Maharashtra Budget 2021 exemption in stamp duty for womens and free bus travel for students)
राज्याच्या बजेटमध्ये अजित पवारांनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा एका क्लिकवर
"कुटुंबातील महिलाच घराची गृहलक्ष्मी असते असं आपण म्हणतो त्यामुळे गृहस्वामिनी खऱ्या अर्थानं तेव्हाच ओळखली जाईल जेव्हा तिच्या नावावर ते घर असेल. त्यामुळे आज महिला दिनाचं औचित्यसाधून राज्यात राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेची घोषणा करत आहे", असं अजित पवार यावेळी म्हणाले. योजनेअंतर्गत कुटुंबातील महिलेच्या नावानं घर विकत घेतलं जाणार असेल तर मुद्रांक शुल्कात एका टक्क्याची सूट देण्यात येईल आणि याबाबतची सविस्तर माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल, असं अजित पवार म्हणाले. कुटुंबातील महिलेच्या नावानं घर विकत घेतलं जाणार असेल तरच या योजनेचा लाभ मिळणार असल्याचंही यावेळी पवारांनी सांगितलं.
राज्यातील विद्यार्थिनींना मोफत बस प्रवास
राज्यातील सर्व ग्रामीण तालुक्यातील विद्यार्थिनींना शाळा आणि महाविद्यालयात जाण्यासाठी मोफत प्रवास करता यावा यासाठी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले योजना सुरु करण्यात येत असून याअंतर्गत बारावीपर्यंतच्या विद्यार्थिंनीना मोफत बस प्रवास करता येईल, असं अजित पवार यांनी जाहीर केलं आहे. शाळकरी मुलींच्या प्रवासासाठी १५०० पर्यावरणपूरक हायब्रीड बसेस उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.