परवानगीशिवाय शाळेच्या नावात 'इंटरनॅशनल' वापरण्यास बंदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 06:43 IST2026-04-03T06:43:41+5:302026-04-03T06:43:41+5:30
शाळांच्या नावात 'इंटरनॅशनल', 'ग्लोबल', 'युनिव्हर्सल', 'वर्ल्ड', 'युरो' असे शब्द परवानगीशिवाय वापरण्यास बंदी

परवानगीशिवाय शाळेच्या नावात 'इंटरनॅशनल' वापरण्यास बंदी
मुंबई : राज्यातील स्वयंअर्थ साहाय्यित शाळा अधिनियमांतर्गत तसेच नोंदणीकृत संस्था, न्यास किंवा कंपन्यांकडून चालवल्या जाणाऱ्या शाळांच्या नावात 'इंटरनॅशनल', 'ग्लोबल', 'युनिव्हर्सल', 'वर्ल्ड', 'युरो' असे शब्द परवानगीशिवाय वापरण्यास शासनाने बंदी घातली आहे. याबाबतचा निर्णय गुरुवार २ एप्रिलला जारी झाला असून, हा निर्णय गुरुवारपासून राज्यभर लागू झाला आहे.
राज्यातील अनेक खासगी शाळा या संस्था, न्यास किंवा कंपन्यांमार्फत स्वयंअर्थ साहाय्यता तत्त्वावर चालवल्या जातात. शाळांच्या मान्यतेसाठी शासनाकडे दाखल होणाऱ्या प्रस्तावांमध्ये इंटरनॅशनल स्कूल, ग्लोबल स्कूल, वर्ल्ड स्कूल, युनिव्हर्सल स्कूल, ऑक्सफर्ड स्कूल किंवा केम्ब्रिज अशा प्रकारची नावे वापरली जातात. मात्र, अशा नावांमुळे पालक आणि विद्यार्थ्यांची दिशाभूल होत असल्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत. प्रत्यक्षात अशा अनेक शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम, सुविधा किंवा कोणत्याही आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाशी संलग्न नसतानाही अशा शब्दांचा वापर करतात. त्यामुळे शासनाने स्पष्ट केले आहे की, शाळा ज्या शैक्षणिक मंडळाशी प्रत्यक्ष संलग्न असतील, त्याची मान्यता असेल त्याच मंडळाचा उल्लेख शाळेच्या नावात करता येणार आहे.
निर्णयातील ठळक मुद्दे
ख्रिश्चन धर्मसंघाद्वारे किंवा खिचन नन्स (भिक्षुणी समुदाय) संचलित शाळांनाच 'कॉन्व्हेंट' हा शब्द वापरण्याची परवानगी राहील; इतर शाळांना हा शब्द वापरता येणार नाही. मान्यताप्राप्त सैनिकी शाळांनाच 'सैनिकी' हा शब्द नावात वापरण्याची मुभा असेल. हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.