Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्रात राहणाऱ्या भाजपाच्या प्रेमींवर भाजपाच्या नेतृत्त्वाचा विश्वास नाही. मराठी माणसावर, गुजराती आणि उत्तर भारतीयांवर विश्वास नाही. कोणावरच विश्वास नाही. परराज्यातून माणसे आणून नजर ठेवत आहेत. अनेक निवडणुका बघितल्या. शिवसेनेचा स्टार प्रचारक म्हणून फिरतोय. किमान दोन ते तीन वेळा माझी बॅग तपासली गेली. त्या बॅगच्या कंपनीला पत्र लिहिणार आहे. ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नेमा असे सांगणार आहे. बॅग हो तो ऐसी हो सबको लगे चेक करो. माझ्या बॅगा तपासल्या हरकत नाही, हे जे भाजपाचे पथक फिरते, रात्री राहतात कुठे, त्यांचा खर्च कोण करते, ते जे फिरतात त्यांच्या बॅगातील ढोकळे फाफडा कुठून आणला, कुणासाठी आणला, अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी केली. मुंबईत महाविकास आघाडीची सभा झाली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला.
पंकजा मुंडे बोलल्या आहेत, त्याचा व्हिडीओ आहे. पंकजाताई तू एक फार मोठे काम केले, महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढलीस, जशी आमच्या चंद्रचूड साहेबांनी न्यायदेवतेच्या डोळ्यावरुन काढून स्वत:च्या डोळ्यावर बांधली होती, तशी तू आमच्या महाराष्ट्राच्या डोळ्यावरील पट्टी काढली. पंकजा मुंडे यांनी काय सांगितले, त्यांचे शब्द वेगळे आहेत, मी त्या काय म्हणाल्या ते सांगतो, किती आहेत बुथ आपल्याकडे ९० हजार, प्रत्येक बुथवरती भाजपाचे दक्षता पथक आहे. ९० हजार बुथवर दक्षता पथके म्हणजे एकापेक्षा अधिक माणसे असणार, एक माणूस धरला तर ९० हजार माणसे, दोन धरली तर १ लाख ८० हजार, तर तीन असतील तर त्याच्या पटीत असतील, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला.
महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे
महाराष्ट्र द्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता जिंकणार हे ठरवणारी निवडणूक आहे. मी तुम्हाला सांगायला आलो आहे की, या सरकारला मुंबईचा जीडीपी वाढवायचा आहे. नीती आयोगाने काही सूचना केल्या आहेत. मुंबई केंद्रशासित करता येत नाही. तोडता येत नाही म्हणून मुंबई महापालिका विसर्जित केली आणि त्यांच्या मित्रांकडून मुंबई ओरबाडणे सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईवर घाला घातला. बटेंगे फटेंगे नहीं आपको काटेंगे. त्यांना बटेंगेची भाषा वापरावी लागते. मोदी पंतप्रधान असताना हे व्हावे मला वाटते की, मोदी यांनी राजीनामा द्यावा. मी आपल्याला शिवसेना कसे काम करते हे दाखवतो, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले.
दरम्यान, २३ तारखेला आपण जिंकणारच, संपूर्ण महाराष्ट्रात फटाके फुटणार आहेत. पण महाझुटी जिंकली, तर गुजरातमध्ये फटाके वाजतील. आम्ही वचन देतोय, त्याला काही पार्श्वभूमी आहे. आजोबांकडून ऐकायचो. बाळासाहेबांनी सांगितले की, दोघांनाही शाळेची फी भरायला पैसे नव्हते. सातवीत असताना माझ्या वडिलांना आणि आजोबांना शाळा सोडावी लागली. अशी अनेक मुले आहेत, ज्यांना शिकावे वाटत आहे. घरी फी भरायला पैसे नाहीत, म्हणून शाळेत जाऊ शकत नाहीत. त्यामुळेच आपण वचन दिले आहे, मुलींप्रमाणे महाराष्ट्रातील मुलांनाही मोफत शिक्षण देणार, असा शब्द उद्धव ठाकरेंनी दिला.