Join us

“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 18:17 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: गेल्यावेळी एके ठिकाणी समोर लढत द्यायला कुणी नसताना आरशासमोर उभे राहून तलवारीने लढले होते, अशी खोचक टीका शर्मिला ठाकरेंनी वरळीतील निवडणुकीबाबत करताना अमित ठाकरेंच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान झाले. मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला. आता २३ तारखेला निकाल काय लागणार, याकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत मनसे पूर्ण ताकदीने उतरली होती. अनेक ठिकाणी उमेदवार दिले होते. परंतु, सर्वांचे लक्ष माहीम मतदारसंघाकडे लागले आहे. राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे पहिल्यांदा निवडणुकीत नशीब आजमावत आहे. तर, अमित ठाकरे यांच्या विजयाचा विश्वास आई शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. 

माहीम मतदारसंघात तिरंगी लढत आहे. मनसेकडून अमित ठाकरे, शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर आणि ठाकरे गटाकडून महेश सावंत निवडणूक लढत आहेत. सदा सरवणकर यांनी निवडणूक अर्ज मागे घ्यावा, यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, यश आले नाही. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर आई शर्मिला ठाकरे यांनी एकूणच प्रचार, अमित ठाकरे यांची लढत याबाबत भाष्य केले आहे. 

माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल

दादर-माहीम भागात अनेक असे भाग आहेत, जे पाहिल्यावर धक्का बसला. त्या भागांत आधी सुधारणा व्हायला हवी. आम्ही सगळे त्याच्या पाठीशी आहोत. आम्ही कोणालाही अर्ज मागे घेण्यास सांगितले नाही. उलट अर्ज मागे घेण्याच्या दिवशी आमच्याकडे आले होते. परंतु, आम्ही भेटलो नाही. त्यामुळे मला अभिमान आहे की, माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल, अशी प्रतिक्रिया शर्मिला ठाकरे यांनी दिली. 

एके ठिकाणी आरशासमोर उभे राहून तलवारीने लढले होते

गेल्यावेळेस एके ठिकाणी इतर पक्षातील आमदार घे. स्वतःच्या पक्षातील आमदाराला बसवा. समोर लढत द्यायला कुणीच नाही आणि आरशासमोर उभे राहून तलवारीने लढले होते, अशी खोचक टीका मागील वरळी निवडणुकीवर करत, माझा मुलगा लढाईत उतरला आहे आणि आमचा त्याला पूर्ण सपोर्ट आहे, असे शर्मिला ठाकरे यांनी सांगितले.

अमितच्या विजयाचा १०० टक्के विश्वास आहे

अमितच्या विजयाचा १०० टक्के विश्वास आहे. गेली ५ वर्षे जे लोकांनी पाहिले आहे. कोविड काळापासून लोकांचे हाल झालेले आहेत. लोक अमितला नक्की निवडून देतील, फक्त मला मोठा विजय हवा आहे. जोरात विजय हवा आहे, छोटा विजय नको, असे शर्मिला ठाकरे यांनी ठामपणे म्हटले आहे. 

दरम्यान, गेले १०, २० वर्ष असलेल्या आमदाराने दादर-माहीम भागातील मूलभूत प्रश्नही सोडवलेले नाहीत. गेल्या महिन्यापर्यंत मुसळधार पाऊस झाला. परंतु, दादरसारख्या भागात पाणी नसेल, दादरमध्ये उघडी गटारगंगा वाहत असेल, तर ही खूपच वाईट गोष्ट आहे आणि ही सुधारली गेलीच पाहिजे. या सुधारणा नक्कीच होऊ शकतात, असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या. 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४मुंबई विधानसभा निवडणूकमाहीमशर्मिला ठाकरेराज ठाकरेअमित ठाकरेमनसेमहाराष्ट्र नवनिर्माण सेना