Join us
Daily Top 2Weekly Top 5

“राज्यात लोकप्रिय चेहरा उद्धव ठाकरेच, कुटुंबप्रमुख म्हणून जनता आदराने पाहते”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 13:47 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: एकनाथ शिंदे कोणत्याही परिस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री नसतील, हा निर्णय अमित शाह यांनीच घेतला आहे, असा मोठा दावा संजय राऊतांनी केला आहे.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: ९०-९० असा फॉर्म्युला नाही. तीनही पक्षांचे समाधान होईल. तसेच अन्य पक्षांना जागा देता येतील, असा आमचा फॉर्म्युला आहे. सोलापूर दक्षिण जागेवर शिवसेनेचा उमेदवार दिलेला आहे. काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केलेला आहे. मी असे मानतो की, टायपिंग मिस्टेक आहे पण अशा टायपिंग मिस्टेक आमच्याकडून होऊ शकतात, असा सूचक इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला. 

मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, दक्षिण सोलापूर संदर्भात काँग्रेस पक्षाने उमेदवार जाहीर केला आहे. मिरजमध्ये काँग्रेसचे उमेदवार देणार असल्याचे माझ्या कानावर आलेले आहे. असे काही झाले तर संपूर्ण महाराष्ट्रात ही लागण लागेल. महाविकास आघाडीत अडचणी होतील म्हणून आम्ही तिघांनी असे ठरवले आहे की, तिघांनी एकमेकांशी चर्चा करायची आणि निर्णय घ्यायचा, असे संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. तसेच - खरे म्हणजे मला आश्चर्य वाटत आहे की, मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्यांना शक्तिप्रदर्शन करावे लागते. यातच त्यांची भीती कळून येते. आमचे केदार दिघे तिकडे सक्षम आहे ते चांगल्या प्रकारे निवडणूक लढतील आनंद दिघे यांचे वारसदार आहेत. शिंदे गट शिवसेना म्हणून मिरवतात ते स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकत नाही त्यांच्या पक्षाचे निर्णय दिल्लीतून ठरतात. अमित ठाकरे लढावे हा देखील निर्णय दिल्लीतून झालेला आहे अशी माझी माहिती आहे. इतकेच नाही, तर शिंदे गटाने कुठे लढावे आणि कुठे नाही, हे निर्णय दिल्लीतून घेतले. जो पक्ष अमित शाह यांचा गुलाम आहे, त्या पक्षांना स्वाभिमानाच्या गोष्टी करू नये, या शब्दांत संजय राऊतांनी हल्लाबोल केला.

राज्यात लोकप्रिय चेहरा उद्धव ठाकरेच

चर्चा संपलेल्या आहेत. आता काही फार काही चर्चा होणार नाही. मुंबईत परंपरेने शिवसेनेचा हा बालेकिल्ला आहे. काँग्रेस पक्षाला मुख्यमंत्रीचा चेहरा ठरवण्यासाठी दिल्लीतून परवानगी घ्यावी लागते. राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात शरद पवार निर्णय घेतील. परंतु, आम्ही असे म्हणतो की, महाराष्ट्राचा लोकप्रिय चेहरा हा उद्धव ठाकरे आहेत. एक कुटुंबप्रमुख म्हणून लोक आजही आदराने पाहतात. प्रेमाने, ममतेने पाहतात. हे सांगायला मला कोणाच्या परवानगीची गरज नाही. तसेच महायुतीवाल्यांनी त्यांचा चेहरा कोण ते आधी ठरवावे. मी खात्रीने सांगतो की, भविष्यात एकनाथ शिंदे हे कोणत्याही परिस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री नसतील, हा निर्णय अमित शाह यांनीच घेतला आहे, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला. 

तुम्हाला खरोखर लढण्याची खुमखुमी असेल ना तर...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या विधानाचा समाचार घेत संजय राऊत म्हणाले की, ते नेपाळ जिंकू शकतात, म्यानमार जिंकतील, अगदी श्रीलंका जिंकतील. ज्यांच्या हातात प्रचंड पैसा आणि ईव्हीएमची सूत्र आहेत, ते कुठेही जिंकू शकतात. हरियाणा कसे जिंकले, हे त्यांनी आपल्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून खरे सांगावे. तु्म्ही शिवसेना फोडली, राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. फोडा , झोडा आणि जिंका अशी तुमची भूमिका आहे. खरोखर लढण्याची खुमखुमी असेल ना तर शिवसेनेचे जे चिन्ह तुम्ही शिंदे गटाला दिले आहे, ते गोठवायला सांगा आणि मग मैदानात या, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले. 

दरम्यान, महाविकास आघाडीतील जागावाटपाचा घोळ अद्यापही संपताना दिसत नाही. संजय राऊतांनी जागावाटपावर केलेल्या विधानांवर नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले. नागपूर विभागात ठाकरे गटाला एक जागा मिळाली, त्यावरून नाराजी असेल तर ते त्यांचे व्यक्तिगत मत आहे. आम्हाला कोकणात काहीच मिळाले नाही असे आम्ही म्हणायचे का? संजय राऊतांनी हा विषय बंद केला पाहिजे, आपल्याला विरोधकांच्या विरोधात लढायचे आहे. ही भूमिका आपण घेतली पाहिजे. संजय राऊतांनी आता आपली तोफ विरोधकांकडे डागली पाहिजे हा माझा प्रेमाचा सल्ला आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४संजय राऊतनाना पटोलेनाना पटोलेमहाविकास आघाडीमहाराष्ट्र विकास आघाडी