Join us
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांना नेमक्या किती आमदारांचे समर्थन? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 11:41 IST

Rahul Narvekar News: कोणताही निर्णय देण्यापूर्वी सर्व नियम आणि कायदे विचारात घेतले जातील, असे राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.

Rahul Narvekar News:अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राज्याच्या राजकारणात मागील साडेतीन वर्षांत तिसरा महाभूकंप झाला. अजित पवार काही आमदारांसह शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील होणार अशी दोन महिन्यांपासून सुरू असलेली चर्चा अखेर खरी ठरली. यानंतर आता घडामोडींना वेग आला आहे. याबाबत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

अजित पवार यांनी शुक्रवारीच विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याची माहिती देण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमधील या बंडानंतर शरद पवारांसोबत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. शरद पवारांच्या सल्ल्याने नवे विरोधी पक्षनेते आणि प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी रातोरात कोणाला कानोकान खबर होऊ न देता अचानक विधान सभा अध्यक्षांचे निवासस्थान गाठले. सुमारे दीड वाजता आव्हाडांनी विरोधी पक्षनेता आणि प्रतोद पदाचे पत्र घेऊन ते राहुल नार्वेकरांकडे सोपविले आणि त्यावर सही, शिक्काही घेतला. यानंतर आता राहुल नार्वेकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.  

अजित पवारांना नेमक्या किती आमदारांचे समर्थन?

राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य जयंत पाटील यांनी ९ आमदारांविरोधात याचिका सादर केली आहे. ती नीट वाचून घेईन. त्यात नमूद केलेल्या मुद्द्यांचा अभ्यास करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे राहुल नार्वेकर यांनी सांगितले. तसेच यावेळी पत्रकारांनी अजित पवार यांना नेमक्या किती आमदारांचे समर्थन आहे, याबाबत प्रश्न विचारला. यावर बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले की,  अजित पवारांच्या समर्थनार्थ किती आमदार आहेत, याची मला कल्पना नाही. तसेच विरोधी पक्षनेत्याची ओळख विधानसभेच्या अध्यक्षाद्वारे केली जाते. कोणताही निर्णय देण्यापूर्वी सर्व नियम आणि कायदे विचारात घेतले जातील, असे राहुल नार्वेकर यांनी नमूद केले. 

दरम्यान, आतापर्यंत अजित पवारांना समर्थन देताना ३५ आमदारांनी सह्या केल्याचे पत्र सादर केले असल्याची महिती समोर आली आहे. मात्र यानंतर आज एकूण ४२ आमदार अजित पवारांना पाठिंबा दर्शवतील अशी माहिती मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सध्या एकूण ५४ आमदार आहेत, यापैकी ४२ आमदार हे अजित पवार याना पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर ४२ आमदार हे अजित पवार यांच्या पाठिशी उभे राहिले तर हा शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

टॅग्स :महाराष्ट्रातील सत्तासंघर्षराहुल नार्वेकरअजित पवार