“राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर अजून सुप्रीम कोर्ट विचार करत आहे”; जयंत पाटलांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 15:03 IST2024-12-09T15:02:30+5:302024-12-09T15:03:01+5:30

Maharashtra Assembly Session December 2024: सुप्रीम कोर्ट अजूनही राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर विचार करत आहे, या सगळ्यात एक सरन्यायाधीश घरी गेले, असे सांगत जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

maharashtra assembly session december 2024 ncp sp jayant patil taunts that rahul Narvekar verdict still considered by supreme court | “राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर अजून सुप्रीम कोर्ट विचार करत आहे”; जयंत पाटलांचा टोला

“राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर अजून सुप्रीम कोर्ट विचार करत आहे”; जयंत पाटलांचा टोला

Maharashtra Assembly Session December 2024: देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून नवनिर्वाचित आमदारांना शपथबद्ध करण्यात आले. पहिल्याच दिवशी मविआने विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत शपथविधीवर बहिष्कार टाकला. परंतु, त्यानंतर दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतली. तिसऱ्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राहुल नार्वेकरांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला. महाविकास आघाडीकडून कुणीही अध्यक्षपदासाठी अर्ज न भरल्याने नार्वेकर बिनविरोध निवडून आले. विधानसभा अध्यक्ष झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सभागृहातील सदस्यांनी राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन केले. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनासाठी मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या प्रस्तावावर बोलताना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य जयंत पाटील यांनी चांगलीच टोलेबाजी केली.

राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर अजून सुप्रीम कोर्ट विचार करत आहे

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडल्यावर पक्ष चिन्ह आणि पक्षाचे नाव यांवरून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. हे प्रकरण तत्कालीन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी आले होते. आता राहुल नार्वेकर पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष झाले आहेत. या प्रकरणी दिलेल्या निकालावरून जयंत पाटील यांनी खोचक टोला लगावला. राहुल नार्वेकर यांना या प्रकरणांमध्ये न्यायदानाचे काम करावे लागले. त्यावेळी नार्वेकरांनी आम्हाला सहकार्य केले. कधी दुजाभाव केला नाही. विधानसभा सभागृहात साक्ष देताना आम्ही बोलायचो तेव्हा ते दुरुस्ती करायला मदत करायचे. अत्यंत संयमीपणे काम केले. राहुल नार्वेकर यांनी असा निकाल दिला की, सुप्रीम कोर्टाला अजून त्यावर निकाल देता आलेला नाही. सुप्रीम कोर्ट अजूनही नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर विचार करत आहे, या सगळ्यात एक सरन्यायाधीश घरी गेले. मला एकच गोष्ट आवडली,  ती म्हणजे तुम्ही कोणाला अपात्र ठरवले नाही. त्याबद्दल आभार, अशी कोपरखळी जयंत पाटील यांनी मारली. 

दरम्यान, राहुल नार्वेकर हे सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. तुम्हाला खासगीत सांगायचो की, परत संधी मिळाली की, मंत्री व्हा. तु्म्ही मंत्री झालात तर जास्त चांगले होईल, असा सल्ला दिला होता. पण शेवटी पक्षाचा निर्णय आहे, त्याबाबत खोलात जायचे नाही. अलीकडच्या काळात सासऱ्यांचे किती ऐकता, हे मला चांगलेच कळायला लागले आहे. तुम्ही गेल्या अडीच वर्षात विधानसभा अध्यक्ष असताना वाद घालण्यासाठी आलेल्यांना गरम कॉफी देऊन पुन्हा घालवले. त्यांना मासे आणि जेवणही खाऊ घातले आहेत. तुमच्या काळात बिझनेस एडव्हाजयरीच्या बैठका व्हायच्या, त्याचा दर्जा बाकीच्या व्यवस्था असल्याने एवढा उंच गेला की, आपणच अध्यक्ष राहावे, अशी आमची तेव्हापासूनची मनोमन इच्छा होती, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
 

Web Title: maharashtra assembly session december 2024 ncp sp jayant patil taunts that rahul Narvekar verdict still considered by supreme court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.