Maharashtra Assembly Election Result 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जबरदस्त धक्का बसला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्षांना अनपेक्षित असा निकाल लागला. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांना ५० जागांचाही आकडा गाठता आलेला नाही. या निकालाचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाही मोठा फटका बसला आहे. ठाकरे गटाच्या केवळ २० जागा निवडून आल्या आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे गटनेते पदाची जबाबदारी दिली आहे. यानंतर आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. या निवडणुकीत ठाकरे गटाचे केवळ २० आमदार निवडून आले आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांची दोन्ही विधिमंडळाचा संयुक्त गटनेता म्हणून नियुक्ती करण्यात केली आहे. विधानसभेच्या शिवसेना गटनेतेपदी भास्कर जाधव यांची तर प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांची नियुक्ती केली आहे. या निर्यणानंतर खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत घराणेशाहीचा आरोप केला होता. त्यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. थोडी तरी पातळी ठेवावी, थोडी तरी लाज बाळगावी. प्रत्येक वेळी बोलायचं आहे म्हणून बोलू नये. जो काही घोळ घातला आहे त्याची मजा घ्या, असं आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच विरोधी पक्षनेतेपदाबद्दल विचारले असता सगळ्या गोष्टी बोलणं योग्य नाही. काही गोष्टींवर विचार सुरु आहे. योग्य वेळी आम्ही त्यावर बोलू, असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.
"४८ तास झाले कोण मुख्यमंत्री होतंय हे पाहूयात. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी होत असेल तर मग १३३ जे जिंकून आलेत त्यांचं काय होणार? मागच्या अडीच वर्षात काही मिळालं नाही, तसंच बसणार का?" असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला.
काय म्हणाले नरेश म्हस्के?
"उद्धव ठाकरे यांचा त्यांच्या आमदारांवर विश्वास नाही. त्यामुळेच पुन्हा एकदा घराणेशाही सुरू करून इतर ज्येष्ठ आमदारांना डावलून आदित्य ठाकरे यांची विधिमंडळ गटनेतेपदी नियुक्ती केलेली आहे. त्यामागे आपले असलेले आमदार फुटतील असं त्यांना वाटतं आहे. आणि त्यामुळे विधिमंडळ गटनेत्याची भूमिका महत्त्वाची आहे. जर आपण नेमणूक केलेला विधिमंडळ गटनेता दुसरा केला आणि तर तोच फुटला तर संपूर्ण पक्ष पुन्हा बाजूला होईल या भीतीने आदित्य ठाकरे यांची नेमणूक विधिमंडळ घटनेचे पदी केलेली आहे," असा दावा नरेश म्हस्के यांनी केला होता.