Join us

"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 21:05 IST

विक्रोळीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार संजय राऊत आणि सुनील राऊत यांना इशारा दिला आहे.

Vikhroli Assembly Constituency :विक्रोळी मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये सुरु असलेल्या वादामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांनी शिंदे गटाच्या उमेदवार सुवर्णा करंजे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर आता सुवर्णा करंजे यांच्या प्रचारासाठी विक्रोळीत आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार संजय राऊत आणि सुनील राऊत यांच्यावर निशाणा साधला. तसेच तुमची पूर्ण लेव्हल केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

"विक्रोळीच्या केसरच्या बागेत आता गाढवं चरायला लागली आहेत. या गाढवांना जागा दाखवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे विक्रोळीकरांनी जास्तीत जास्त मते देवून करंजे यांना विजयी करा. एवढे मतदान करा की मतांच्या ढिगाऱ्यात चंगू मंगु साप बुडाले पाहिजे. बाळासाहेबांची निशाणी काय? ओरिजनल कोण आणि ड्युप्लीकेट कोण? हे समजायला हवं. त्यांची निशाणी काय आहे. तर आग लावण्याची निशाणी आहे. सुवर्णा ताईंना बकरी म्हणतो. त्याला कळेल  २३ तारखेला कळेल बकरी आहे की वाघीण. बाळासाहेब सांगायचे माझी महिला आघाडी म्हणजे रणरागिणी आहे. माझ्या ताईचा अपमान करू नका. तुमची पूर्ण लेव्हल केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

"मला पण तुम्ही हलक्यात घेतलं. त्याचे परिणाम आता दिसत आहेत. शिवसेना आणि धनुष्यबाण तुम्ही काँग्रेसच्या दावणीला बांधला. आम्ही शिवसेना वाचवली. तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून आम्ही तुम्हाला सोडण्याचा निर्णय घेतला," असं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं.

"आम्ही सुडाचा राजकारण करत नाही. नारायण राणे यांना जेल मध्ये टाकत नाही. पत्रकारांना जेल मध्ये टाकत नाही. हनुमान चालीसा म्हणणाऱ्या नवनीत राणा यांना जेलमध्ये टाकत नाही. देवेंद्र फडणवीस आणि इतर चार पाच जणांची नावे कारवाईसाठी होती. पण आम्ही विरोध करत सरकार पाडून टाकले आणि आपल्याला अपेक्षित सरकार आणलं. आम्ही लाडकी बहीण योजना सुरु केली. त्याचा तुम्ही विरोध केला आता तुम्ही म्हणता ३००० रुपये देणार म्हणता. त्यावेळी आम्हाला विचारलं गेलं की पैसे कुठून आणणार? आता तुम्ही कुठून पैसे आणणार, पाऊस पडणार का?" असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. 

"विक्रोळी जर गुंडगिरी मुक्त करायची असेल तर तुम्हाला संधी आहे. या लाडक्या बहिणीला (सुवर्णा कारंजे) उमेदवारी दिली आहे. सकाळचा भोंगा बंद करायचा असेल तर तुम्हाला संधी आहे. सरकारच्या योजना सर्व समाजासाठी आहेत. कुठलाही भेदभाव करत नाही. शासकीय योजनेचा लाभ सर्वाना मिळत आहे. म्हणून कोणीही आला तरी कुठलीही योजना बंद पडू देणार नाही. सुवर्णा करंजे यांचा विजय म्हणजे महायुती आणि एकनाथ शिंदे आणि सर्वसामान्य लोकांचा विजय असेल," असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४मुंबई विधानसभा निवडणूकविक्रोळीएकनाथ शिंदे