Join us

"महाजॉब्स योजना शिवसेना-राष्ट्रवादीची आहे की महाविकास आघाडीची?"; काँग्रेसची थेट नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 11:27 IST

आघाडीचे गठन होत असताना ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची व त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही? हा माझ्या सारख्या सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे अशा शब्दात सत्यजित तांबे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देअलीकडेच राज्य सरकारने बेरोजगार तरुणांसाठी महाजॉब्स पोर्टल सुरु केले होतेआघाडीत किमान समान कार्यक्रमाची व त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही? युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांचा सवाल

मुंबई – राज्यातील महाविकास आघाडीत काँग्रेस नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना काँग्रेसला डावलण्यात येतंय का? असा प्रश्न काँग्रेस नेत्यांना पडला आहे. महाजॉब्स पोर्टलवरुन युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी याबाबत ट्विट करुन थेट महाविकास आघाडी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

याबाबत सत्यजित तांबे यांनी ट्विट करुन म्हटलं आहे की, महाजॉब्स ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे की, शिवसेना-राष्ट्रवादीची? आघाडीचे गठन होत असताना ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची व त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही? हा माझ्या सारख्या सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

या ट्विटसोबत तांबे यांनी एक फोटो जोडलेला आहे, यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांचा फोटो आहे, त्यात कुठेही काँग्रेस मंत्र्यांचा फोटो लावण्यात आला नाही, त्यामुळे काँग्रेसचे नेत्यांना राज्य सरकारमध्ये डावलण्यात येत असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे.  

काही दिवसांपूर्वीच बाळासाहेब थोरात आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास १ तास चर्चा झाली, काँग्रेसचे मंत्री नाराज असल्याची चर्चा होती, तेव्हा बाळासाहेब थोरात आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती, या चर्चेनंतरही ज्या ठरलेल्या गोष्टी आहेत त्या होताना दिसत नाही अशी नाराजी असल्याचं सांगण्यात येत आहे. राजस्थानमध्ये सुरु असलेल्या राजकीय घडामोडींबाबतही चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांचे भाच्चे आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांना जाहीरपणे महाविकास आघाडी सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

अलीकडेच राज्य सरकारने बेरोजगार तरुणांसाठी महाजॉब्स पोर्टल सुरु केले होते, MAHAJobs हे संकेतस्थळ महाराष्ट्राच्या शिरपेचातील मानाचा तुरा आहे. काळाची गरज ओळखून सुरु करण्यात आलेल्या या पोर्टलच्या माध्यमातून भूमिपुत्रांना पारदर्शकपणे रोजगार उपलब्ध करून दिला जावा. तसेच मोबाईलवर महाजॉब्स नावाचे ॲप  उपलब्ध करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावेळी दिल्या होत्या.  

टॅग्स :उद्धव ठाकरेराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेनाकाँग्रेसमहाराष्ट्र विकास आघाडी