Mahajan and Dutt fight again in a colorful position | महाजन आणि दत्त लढत पुन्हा रंगतदार अवस्थेत
महाजन आणि दत्त लढत पुन्हा रंगतदार अवस्थेत

खलील गिरकर

मतदारांशी संपर्क नसल्यामुळे चर्चेत असलेल्या दोन उमेदवारांतील निवडणूक अशी सुरूवातीला काहीशी नकाराची छटा लाभलेली भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा पूनम महाजन आणि काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांच्यातील निवडणूक रंगतदार अवस्थेत गेली. आधी निवडणूक रिंगणात उतरण्यास नकार दिलेल्या प्रिया दत्त यांनी महाजन यांच्यापुढे कडवे आव्हान उभे केल्याने सुरूवातीला भाजपसाठी सहजसोप्या वाटणाºया या लढतीचे खडतर आव्हानात रूपांतर झाले.

या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमधील मुद्द्यांपेक्षाही अधिक चर्चेत आला, तो शिवसेना आणि भाजपच्या युवक संघटनांतील खदखदणाºया संघर्षाचा पदर. भाजयुमोच्या अध्यक्षा असल्याने महाजन यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांना महत्व न दिल्याने वाढलेल्या वादाचा मुद्दा ‘मातोश्री’वर पोहोचला. तेथे तो सुटल्याचे सांगितले जात असले, तरी सतत उफाळणाºया संघर्षामुळे तो शमला नसल्याचे दिसून आले. येथे दोन लाखांवर नवमतदार आहेत. त्यांना आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत दोन्ही पक्षांकडून तरुणाईच्या मुद्द्यांना हात घातला जात आहे. महाजन यांच्या प्रचारात भाजयुमोची, तर दत्त यांच्यासाठी युवक काँग्रेसची फळी कार्यरत आहे. या मतदारसंघात सुमारे पाच लाख अल्पसंख्याक आणि तेवढेच मराठी मतदार आहेत. दलित मतदारांचे प्रमाण देखील लक्षणीय आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने प्रभाव पाडल्याचे मतदारांना जाणवेल तरच त्याचा फटका अन्य उमेदवारांना बसण्याची शक्यता होती.

महाजन यांच्या प्रचाराचा सुरूवातीचा भर हा भाजपचा पारंपरिक मतदार असलेल्या गुजराती-मारवाडी, उत्तर भारतीय मतांची पेढी कायम राखण्यावर होता, तर दत्त यांनी मराठी, उत्तर भारतीय, मुस्लिम, दलित मतदार डोळ््यासमोर ठेवत प्रचाराची आखणी केली. त्याचा दत्त यांना फायदा होतोय, हे लक्षात येताच भाजपने प्रचाराची दिशा बदलली. मुस्लिम समाज आपल्या पाठीशी उभा राहणार नाही, असा विचार करणाºया थिंक टँकने त्या समाजासाठी केंद्रातील-राज्यातील नव्हे, तर स्थानिक नेत्यांनाही उतरविले. स्वतंत्र मेळावे घेतले. मागील वेळेप्रमाणे उत्तर भारतीय मतदार यंदा एकच राजकीय विचार करण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे त्या समाजाला भावतील, असे मुद्दे-आश्वासनांची सारखपेरणी झाली.

मनसेच्या सभा-पाठिंब्यामुळे येथील मराठी टक्का काँग्रेसकडे वळेल, असे आडाखे बांधले जात होते; पण काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करण्यावरून मनसेतील काहीसा संभ्रम होता. एका गटाचा प्रचारात सक्रीय सहभाग आहे, तर एक गट अलिप्त असल्याने काँग्रेसला मराठी मतांसाठी वेगळा प्रयत्न करावा लागला. शिवाय भाजपनेही मराठी मतदार डोळ्यासमोर ठेवून आखणी केली आहे.

महाजन यांच्या प्रचाराचा भर मोदी सरकारची पाच वर्षांतील कामगिरी, मतदारसंघातील विकासकामे यावर आहे; तर प्रिया दत्त यांनी देश पातळीवरील वातावरण, संविधान धोक्यात आल्याचा मुद्दा, मतदारसंघात पाच वर्षात विकासकामे झालीच नसल्यावर भर देत प्रचार केला.
ज्येष्ठ अभिनेते सुनील दत्त यांनी बांधणी केलेला हा मतदारसंघ असल्याने दत्त परिवाराचा पगडा येथे जाणवला. त्याचवेळी भाजपची संघटनात्मक ताकद, महाजन यांना केंद्रीय संघटनेत दिलेली नेतृत्त्वाची संधी आणि दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची कन्या असल्याने पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचा वावर येथे दिसला. त्यामुळे पारंपरिक मतदारांना वळवण्यातील दत्त यांचे प्रयत्न आणि केंद्र-राज्यातील सरकारच्या कामगिरीचे भांडवल करण्याचे महाजन यांचे प्रयत्न याभोवती प्रचाराचे वारे फिरले.

नागरिकांच्या सहभागातून मतदारसंघाचा विकास साधण्यास मी कटीबध्द आहे. गेल्या पाच वर्षांत मतदारसंघातील अनेक प्रश्न सोडवले आहेत. जे प्रश्न उरले आहेत, ते निवडून आल्यानंतर प्राधान्याने सोडवण्यात येतील. कामांमुळेच मला विजयाची खात्री आहे. - पूनम महाजन, भाजपा

पाच वर्षांत देशातील वातावरण कमालीचे गढूळ झाले आहे. मतदारसंघाचा पुरेसा विकास झालेला नाही. मतदारांना विकासाऐवजी इतर बाबींकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ्र्रकेवळ या मतदारसंघाचा विचार न करता देशहिताचा व्यापक विचार करुन मतदान करण्याची गरज आहे. - प्रिया दत्त, काँग्रेस

कळीचे मुद्दे
विमानतळ परिसरातील ९० हजार झोपड्यांच्या पुनर्वसनाचा प्रलंबित असलेला प्रश्न सोडवण्याचा मुद्दा.
कब्जे हक्काने दिलेल्या शासकीय जमिनी मालकी हक्काने देताना सध्यापेक्षा कमी प्रीमियमची मागणी.


Web Title: Mahajan and Dutt fight again in a colorful position
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.