मविआ नेत्यांनी घेतली CM देवेंद्र फडणवीसांची भेट; ‘या’ दोन महत्त्वाच्या पदांवर केला दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 16:03 IST2024-12-08T16:01:48+5:302024-12-08T16:03:40+5:30
Maharashtra Politics: महाविकास आघाडीतील नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि दोन महत्त्वाच्या पदांवर दावा केल्याचे सांगितले जात आहे.

मविआ नेत्यांनी घेतली CM देवेंद्र फडणवीसांची भेट; ‘या’ दोन महत्त्वाच्या पदांवर केला दावा
Maharashtra Politics: मुंबईतील आझाद मैदानावर महायुती सरकारचा महाशपथविधी सोहळा अतिशय दिमाखदार पद्धतीने संपन्न झाला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून नवनिर्वाचित आमदारांना शपथबद्ध करण्यात आले. पहिल्याच दिवशी मविआने विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत शपथविधीवर बहिष्कार टाकला. ईव्हीएमवर आरोप करत त्याविरोधातील भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लावून धरली आहे. यावरून महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत.
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीतील नेत्यांनी आमदारकीची शपथ घेतली. परंतु, यावेळी महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि दोन महत्त्वाच्या पदांवर दावा केल्याची माहिती देण्यात आली आहे. तत्पूर्वी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राहुल नार्वेकरांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला. महाविकास आघाडीकडून कुणीही अध्यक्षपदासाठी अर्ज न भरल्याने नार्वेकर बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नार्वेकरांच्या निवडीची केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे, असे सांगितले जात आहे.
मविआ नेत्यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट
राज्य चालवण्यासाठी जेवढे सत्ताधारी महत्त्वाचे असतात, तेवढेच विरोधक महत्त्वाचे आहे. विरोधी पक्षनेतेपद आम्हाला मिळावे, असे आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितले. विरोधी पक्ष नेता निवडीसाठी संख्याबळ महत्त्वाचे नाही. हा मुद्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पटवून दिला. विरोधी पक्षनेतेपदासह विधानसभा उपाध्यक्ष पद मिळावे, असे दोन प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मांडण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमच्या दोन प्रस्तावासंदर्भात सकारात्मक आहेत. विधानसभा अध्यक्ष निवडीनंतर यासंदर्भात निर्णय होईल, अशी माहिती भास्कर जाधव यांनी दिली.
दरम्यान, गेल्या अनेक वर्षांची परंपरा होती की, सत्ताधाऱ्यांकडे विधानसभा अध्यक्षपद तर विरोधकांकडे विधानसभेचे उपाध्यक्ष पद असावे. भाजपा आणि शिवसेनेच्या काही चुकांमुळे ही परंपरा खंडित झाली होती. त्यामुळे ही परंपरा पुन्हा सुरू करावी आणि उपाध्यक्ष पद मिळावे, अशी विनंती आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली, असेही भास्कर जाधव म्हणाले. तसेच विधानसभा अध्यक्ष बिनविरोध व्हावा ही परंपरा राहिली आहे. विरोधीपक्ष नेता यासंदर्भात व्यवस्था असली पाहिजे. दिल्लीत आपने भाजपाचा विरोधी पक्षनेता करण्यास दिला. ही भूमिका आम्ही मांडली, असे नाना पटोले यांनी सांगितले.