"मी मोदींचा भक्त, भाजप म्हणजे घर"; महेश कोठारे म्हणाले, "मुंबईवर कमळ फुलणार, महापौरही इथूनच"
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 13:23 IST2025-10-20T13:04:06+5:302025-10-20T13:23:47+5:30
Mahesh Kothare on BMC Elections: कांदिवलीतील दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात जेष्ठ अभिनेते महेश कोठारे यांनी मुंबईत कमळ फुलणार असल्याचे म्हटलं.

"मी मोदींचा भक्त, भाजप म्हणजे घर"; महेश कोठारे म्हणाले, "मुंबईवर कमळ फुलणार, महापौरही इथूनच"
Mahesh Kothare on Bjp: मागाठाणे येथील दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात जेष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेट भाष्य केले, ज्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यावेळी महेश कोठारे यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे कमळ फुलणार असल्याचे विधान केले.
"भाजप म्हणजे आपलं घर; मी मोदींचा भक्त"
मागील १५ वर्षांपासून हा कार्यक्रम साजरा होत असून, कोठारे यांनी यावेळी भाजपबद्दलचे आपले प्रेम व्यक्त केले. ते म्हणाले, "हा कार्यक्रम आपल्या घरचा आहे. भाजप म्हणजे आपलं घर आहे, कारण मी स्वतः भाजपचा भक्त आहे. मी पंतप्रधान मोदींचा भक्त आहे."
मुंबई महापालिकेवर 'कमळ' फुलणार
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीवर जोर देत कोठारे यांनी ठाम विश्वास व्यक्त केला. "पुढच्या वर्षीच्या दिवाळीच्या कार्यक्रमापर्यंत मुंबईवर कमळ फुललेलं असेल याची मला गॅरंटी आहे," असं कोठारे म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे भाजपने महापालिका निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापौर पदावरून महायुतीत स्पर्धा
महेश कोठारे यांनी महापौरपदाबद्दल केलेल्या विधानामुळे महायुतीतील अंतर्गत स्पर्धेची चर्चा सुरू झाली. "आपल्याला नगरसेवक निवडून द्यायचा आहे, पण यावेळचा महापौरही इथून निवडून गेलेला असेल," असं महेश कोठारेंनी म्हटलं. त्यामुळे भाजपने मुंबई महापालिकेच्या महापौरपदावर दावा करण्याची तयारी केल्याचे त्यांच्या या बोलण्यातून दिसून आले.
या कार्यक्रमाला भाजपचे माजी खासदार गोपाल शेट्टी, भाजपचे उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, भाजप उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष बाळा तावडे आणि महेश कोठारे यांच्यासह स्थानिक रसिक संख्येने उपस्थित होते. दिवाळी पहाटच्या निमित्ताने भाजपच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र येत निवडणुकीच्या तयारी केल्याचे दिसून आलं.