महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 06:57 IST2026-04-11T06:56:45+5:302026-04-11T06:57:13+5:30
समिती स्थापन करण्याचेही आदेश

महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी अपर मुख्य सचिव (गृहनिर्माण) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी. शेलू व वांगणी येथे पात्र कामगारांना घरे देण्याबाबत तसेच ठाणे, उलवे, बोरीवली, मिरा-भाईंदर येथे घरांची उपलब्धता वाढवून पनवेल-कोनगावमधील २ हजार ५२१ घरांची लॉटरी काढावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हाडाला दिले आहेत.
१३ मार्च रोजी विधान भवनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. गृहनिर्माण विभागाने या बैठकीचे इतिवृत्त ६ एप्रिल रोजी प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार, या इतिवृत्तानंतर मुंबईमध्ये जास्तीत जास्त कामगारांना घरे उपलब्ध करून द्यावीत, असे म्हणणे गिरणी कामगार तरुण स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष तेजस कुंभार यांनी मांडले आहे. शिवाय निर्देशाची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणीही केली आहे.
शेलूतील प्रकल्पाचे भूमिपूजन
शेलू येथील प्रकल्प हा कर्मयोगी एव्हीपी रियालिटी यांच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. येथे गिरणी कामगारांनी स्वैच्छिकरीत्या संमती पत्र भरून दिले आहेत. या प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १ मे रोजी होणार आहे. संमती पत्र दिलेल्या कामगारांना घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
गिरणी कामगार प्रकल्पांसाठी कॉर्पस फंडाची तरतूद करावी
- रायगड जिल्ह्यातील २,५२१ घरांची दुरुस्ती एमएमआरडीएने करावी आणि दरम्यानच्या कालावधीत म्हाडाने या घरांची लॉटरी काढावी. एनटीसीच्या सहा गिरण्यांच्या जागेवर गिरणी कामगारांसाठी घरे बांधण्याची शक्यता तपासावी.
- बोरीवली येथील खटाव मिल आणि इतर उपलब्ध जागांवर घरे उभारण्याबाबत तपासणी करावी. टाटा मिल व नायगाव येथील मिल जागांवर घरबांधणीसाठी क्षमता तपासावी. एनटीसीकडील उपलब्ध जमिनीची माहिती घेऊन त्या जमिनीवर घरांचा प्रस्ताव तयार करावा. स्वदेशी मिलच्या जागेवर ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर घरे देता येतील का, याची तपासणी करावी.
- संक्रमण शिबिरातील रिकामी होणारी घरे गिरणी कामगारांना देण्याची शक्यता तपासावी. झोपडपट्टी पुनर्वसनप्रमाणे कॉर्पस फंडाची तरतूद गिरणी कामगार प्रकल्पांसाठी करावी. वाढीव एफएसआय देऊन अधिक घरे उपलब्ध करता येतील का, याचा अभ्यास करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
गृहनिर्माण विभागाने तयार केलेल्या समितीमध्ये गिरणी कामगार तरुण स्वराज्य संघटनेचा समावेश करावा. जेणेकरून खेड्यापाड्यातील सर्वसामान्य गिरणी कामगारांपर्यंत न्याय पोहोचेल.
-विठ्ठल चव्हाण, सेक्रेटरी, गिरणी कामगार तरुण स्वराज्य संघटना.