Join us  

मविआत नाराजीनाट्य! सांगलीनंतर आता मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाडही नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2024 3:51 PM

दक्षिण मध्य मुंबईच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही होती. परंतु ही जागादेखील ठाकरे गटाला सोडण्यात आल्याने मुंबई काँग्रेस अध्यक्षांनी हायकमांडकडे नाराजी व्यक्त केली.

मुंबई - Varsha Gaikwad Upset in Congress ( Marathi News ) गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर महाविकास आघाडीने अधिकृतपणे जागावाटपाबाबत घोषणा केली. मात्र या घोषणेनंतर नाराजीनाट्य पसरलं आहे. सांगलीची जागा ठाकरे गटाला सोडल्यानंतर स्थानिक काँग्रेस नेते नॉट रिचेबल झालेत. तर दुसरीकडे मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनीही दिल्लीला नाराजी कळवली आहे.

महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या घोषणेनंतर नाराज वर्षा गायकवाड यांनी काँग्रेसचे सचिव के.सी वेणुगोपाल यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचं कळतं. मुंबईत काँग्रेसला २ जागा सोडल्यात त्यात उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबईचा समावेश आहे. दक्षिण मध्य मुंबई जागेसाठी काँग्रेस आग्रही होती. या जागेवर वर्षा गायकवाड इच्छुक होत्या. या ठिकाणी एकनाथ गायकवाड हे काँग्रेसचे माजी खासदार राहिले आहेत. त्यामुळे दक्षिण मध्य मुंबई ही जागा काँग्रेससाठी अनुकूल होती. मात्र ती जागा ठाकरे गटाला सोडण्यात आल्यानं नाराजी वाढली आहे.

इतकेच नाही तर मविआची पत्रकार परिषद झाल्यानंतर काँग्रेस नेत्यांना प्रतिक्रिया विचारण्यात आल्या. परंतु ज्येष्ठ नेते काही न बोलता निघून गेले. मविआच्या जागावाटपावर वर्षा गायकवाड समाधानी नाहीत. ज्या जागा आम्ही निवडून येऊ शकतो त्या जागा आम्हाला मिळालेल्या नाहीत. ज्या जागांवर आमची ताकद नाही असा जागा देण्यात आल्याची तक्रार वर्षा गायकवाड यांची आहे. राहुल गांधी यांची मुंबईत यात्रा आली, तेव्हा धारावीतून सर्वात जास्त प्रतिसाद मिळाला. दक्षिण मध्य मुंबई जागेसाठी काँग्रेस आग्रही होती. परंतु तिथे ठाकरे गटाचे अनिल देसाई यांना मविआकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे.

नाना पटोले म्हणतात...

माध्यमांच्या बातम्यांवर मी बोलणार नाही. मी किती आग्रही होतो, किती प्रयत्न केले हे लोकांनी पाहिले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा वाद संपला, मात्र पुन्हा वादात आणायचा प्रयत्न काही मीडिया करतंय. आमचं सगळ्यांशी बोलणं सुरू आहे. आता हा विषय बंद करावा. गुढीपाडव्यानिमित्त आम्ही भाजपाला राज्यातून हद्दपार करण्याचा संकल्प घेतला आहे. वर्षा गायकवाड या मोठ्या नेत्या आहेत. मुंबई शहराच्या अध्यक्षा आहेत. काही मर्यादेपर्यंत जायचं असतं, मर्यादे पलीकडे जायचं नसते असा सल्ला पटोलेंनी दिला.  

टॅग्स :काँग्रेसमहाविकास आघाडीवर्षा गायकवाडलोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४मुंबई दक्षिण मध्य