लोकमत इम्पॅक्ट : गोराई गावातील पाण्याची समस्या लवकर दूर करण्याचे पालिकेचे आश्वासन 

By मनोहर कुंभेजकर | Published: April 27, 2024 05:27 PM2024-04-27T17:27:17+5:302024-04-27T17:28:08+5:30

“नो वॉटर नो व्होट” या आंदोलनामुळे आता मुंबई महानगरपालिकेने शुक्रवारी गोराई कोळीवाडयात जावून स्थानिकांना येथील  पाण्याची समस्या लवकर दूर करण्याचे आश्वासन दिले.

Lokmat Impact: Municipality promises to solve water problem in Gorai village soon | लोकमत इम्पॅक्ट : गोराई गावातील पाण्याची समस्या लवकर दूर करण्याचे पालिकेचे आश्वासन 

लोकमत इम्पॅक्ट : गोराई गावातील पाण्याची समस्या लवकर दूर करण्याचे पालिकेचे आश्वासन 

मुंबई - बोरीवलीतील गोराई-कुलवेम येथे राहणाऱ्या सुमारे ६००० कुटुंबांनी या भागात सततच्या पाणीटंचाईला तोंड देत आगामी लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. “नो वॉटर नो व्होट” या आंदोलनामुळे आता मुंबई महानगरपालिकेने शुक्रवारी गोराई कोळीवाडयात जावून स्थानिकांना येथील  पाण्याची समस्या लवकर दूर करण्याचे आश्वासन दिले.

या संदर्भात दि,24 एप्रिल रोजी लोकमत ऑन लाईन मध्ये आणि दि,25 एप्रिल रोजी दैनिक लोकमत मध्ये "नो वॉटर, नो व्होट,"गोराईकरांचा नारा या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द झाले होते.लोकमतच्या वृत्ताचे पडसाद राजकीय वर्तुळात, आणि गोराई गावात पडले.लोकमतच्या वृत्ताची दखल घेत काल सकाळी 11 ते दुपारी दीड पर्यंत पालिकेचे जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांनी गोराई गावाला भेट दिली. माळवदे यांनी वर्षभरापूर्वी प्रस्तावित केलेल्या गावातील  सक्शन टँकच्या जागेची पाहणी केली.अजून येथे काम सुरच झाले नसल्याचे गावकऱ्यांनी त्यांच्या  निदर्शनास आणले.

गोराई व्हिलेजर्स वेल्फेअर असोसिएशनच्या अध्यक्षा स्वित्सी हेन्रिक्स यांनी लोकमतला सांगितले की,आमच्या संघटनेने पालिका जल विभाग, लोकप्रतिनिधी आणि आर मध्य विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांना येथील पाणी टंचाई दूर करण्यासाठी अनेकवेळा पत्रव्यवहार केला,मात्र आजपर्यंत आम्हाला कोणतीही मदत मिळाली नाही.आता स्थानिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयामुळे नंतर पालिकेच्या जल अभियंता आणि संबंधित अधिकाऱ्यांनी थेट गोराई गावाला भेट देवून गावकऱ्यांना येथील पाणी टंचाई दूर करण्यात येईल असे आश्वासन दिल्याची माहिती त्यांनी दिली.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील बोरीवली खाडीपलीकडे वसलेल्या गोराई-कुलवेम गावांना  गेल्या दहा ते बारा दिवसांपासून राहणाऱ्या अंदाजे 6,000 कुटुंबांना पाणीपुरवठा झालेला नाही.   या गावाच्या भौगोलिक स्थितीमुळे येथे पाणी टंचाई आहे. एक दशकाहून अधिक काळ येथील कुटुंबांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. त्यांच्या घरी कायदेशीर नळ असूनही या गावकऱ्यांना सरकारी बावडी गावातील पाच विहिरीतून पाणी आणण्यासाठी मैल पायपीट करावी लागते. या विहिरी निकृष्ट दर्जाच्या आहेत आणि पिण्यायोग्य पाणी पुरवत नाहीत, त्यामुळे रहिवासी पाण्याच्या टँकरवर अवलंबून असतात अशी माहिती गावकऱ्यांनी जल अभियंता माळवदे यांना दिल्याचे डेसमंड पॉल यांनी सांगितले.

येथील सक्शन टँक प्रकल्प पूर्ण होण्यासाठी किमान 10 महिने लागतील.सक्शन टँक बांधला जाईपर्यंत आणि पाण्याचा प्रश्न पूर्णपणे सुटत नाही तोपर्यंत त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी गावकऱ्यांना दररोज किमान चार पाण्याचे टँकर देण्याचे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती गोराई मच्छिमार सोसायटीचे सचिव रॉनी किनी यांनी दिली.

दरम्यान येथील पाणी टंचाईचे एक कारण म्हणजे बेकायदेशीर नळजोडण्यांमुळे होणारी पाण्याची चोरी आहे. आम्ही येथील पाणी कनेक्शनची पडताळणी करू आणि व्यक्तींना ते कायदेशीर करण्याची विनंती करू. जर त्यांनी तसे केले नाही तर आम्ही त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करू असे माळवदे म्हणाले.
 

Web Title: Lokmat Impact: Municipality promises to solve water problem in Gorai village soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.