लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 06:40 IST2025-08-23T06:39:26+5:302025-08-23T06:40:23+5:30

काँक्रिटीकरणाच्या कामात काही पाइपलाइनला गळती लागल्याचे प्रकार घडले, त्यामुळे दूषितीकरण आढळले असावे, अशी शक्यताही त्यांनी वर्तविली.

Lokmat Impact Minister Ashish Shelar takes note of contaminated water supply; Instructions for immediate action | लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना

लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई शहराच्या अनेक भागांमध्ये नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे खुद्द पालिकेच्याच पर्यावरण अहवालातून समोर आल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिल्यानंतर सांस्कृतिक कार्यमंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी त्याची दखल घेत मुंबईच्या कोणत्याही भागात अशा प्रकारे पाणी दूषित येत असेल तर त्यावर तत्काळ कार्यवाही झाली पाहिजे, अशा सूचना पालिका प्रशासनाला शुक्रवारी दिल्या. मध्यंतरीच्या काळात पालिकेकडून सुरू असलेल्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामात काही पाइपलाइनला गळती लागल्याचे प्रकार घडले, त्यामुळे दूषितीकरण आढळले असावे, अशी शक्यताही त्यांनी वर्तविली. 

सुमारे दीडशे किमी अंतरावरील जलशुद्धीकरण केंद्रांतून जलवाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा होतो. जलवाहिन्यांचे बाह्य विभागामध्ये सुमारे ३८० किलोमीटर अंतराचे जाळे आहे. 

या जलवाहिन्या जंगल, दुर्गम भागात अंथरलेल्या असून, त्या बहुतांश जमिनीखाली आहेत. काही भागातील जलवाहिन्या जीर्ण झाल्या असून, त्यांची गळती होते. त्यामुळे दूषितीकरणाचा धोका वाढतो. वर्ष २०२२ ते २०२५ दरम्यान पाणी गळतीच्या तब्बल ९६ हजार तक्रारी आल्या आहेत.

काॅंक्रिटीकरण दाेषी

बोरिवलीतील एक्सर भागात रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणादरम्यान मलनिस्सारण वाहिनीला गळती लागली होती. अनेक दिवस गळती झाल्यानंतर पालिकेने त्यावर मलमपट्टी करून रस्ता बंद केल्याचा दावा काँग्रेसच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी केला. त्यामुळे कांदिवली, चारकोपसारख्या भागातही रस्ते काँक्रिटीकरणामुळे पाणी दूषित होत असल्याचे त्यांनी म्हटले.

ब्रिटिशकालीन जलवाहिन्या जीर्ण : आमदार पटेल

भेंडी बाजार, मस्जिद बंदर परिसराच्या बी वॉर्डात ३.२ टक्के दूषित पाण्याचे नमुने आढळले आहेत. २०२५ मध्ये आतापर्यंत पाणी गळतीच्या ८५३ तक्रारी आल्या आहेत. मुंबादेवी विधानसभेचे आमदार अमीन पटेल यांनी याला दुजोरा देत दूषित पाण्याच्या तक्रारीचा ओघ येत असल्याचे नमूद केले. या परिसरातील जलवाहिन्या ब्रिटिशकालीन असल्यामुळे जीर्ण झाल्या आहेत. तसेच अनेक जलवाहिन्या हौस गल्ल्यांच्या खालून असल्याने त्यांची दुरुस्तीही अशक्य असल्याचे त्यांनी म्हटले. मलनिस्सारण वाहिन्यांचे पाणी अनेकदा जलवाहिन्यांमध्ये मिसळते आणि लोकांच्या तक्रारी येतात, अशी माहिती देतानाच पालिकेने जलवाहिन्यांचे जाळे बदलण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.  

Web Title: Lokmat Impact Minister Ashish Shelar takes note of contaminated water supply; Instructions for immediate action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.