'कमवा आणि शिका'; उच्च शिक्षणासाठी विद्यार्थिनींना दरमहा दोन हजार रुपये, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रालयाने महाविद्यालयामार्फत दिली रोजगाराची संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 14:03 IST2025-08-29T14:03:37+5:302025-08-29T14:03:47+5:30
Education: राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रालयाने नवी योजना आखली आहे. त्याअंतर्गत पात्र विद्यार्थिनींना महाविद्यालयामार्फत रोजगाराची संधी देण्यात येणार असून, दरमहा दोन हजार रुपये कमविण्याची सुविधा मिळेल.

'कमवा आणि शिका'; उच्च शिक्षणासाठी विद्यार्थिनींना दरमहा दोन हजार रुपये, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रालयाने महाविद्यालयामार्फत दिली रोजगाराची संधी
मुंबई - राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रालयाने नवी योजना आखली आहे. त्याअंतर्गत पात्र विद्यार्थिनींना महाविद्यालयामार्फत रोजगाराची संधी देण्यात येणार असून, दरमहा दोन हजार रुपये कमविण्याची सुविधा मिळेल. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य खरेदी व शिक्षणाचा खर्च भागविण्यास हातभार लागणार आहे.
सध्या उच्च शिक्षण घेताना मुलींची टक्केवारी वाढत आहे. मात्र, अनेकदा आर्थिक अडचणीमुळे अनेकांना शिक्षण थांबवावे लागते. अशावेळी 'कमवा आणि शिका' योजना मुलींना दिलासा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. महाविद्यालयांमार्फत विद्यार्थिनींना कार्यालयीन कामे, वाचनालय, प्रयोगशाळा तसेच शैक्षणिक उपक्रमांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. त्या बदल्यात त्यांना दोन हजार रुपये मासिक मानधन दिले जाईल. यामुळे विद्यार्थिनींना दैनंदिन खर्च भागवण्यासाठी पैसा मिळेल. या मानधनामुळे प्रवास, वह्या-पुस्तके खरेदी यासाठी मदत होईल. यामुळे मुलींना पालकांवर पूर्णपणे अवलंबून राहावे लागणार नाही. स्वावलंबी झाल्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होईल.
राज्यभरातील पाच लाख मुलींना थेट लाभ
योजनेचा थेट लाभ राज्यातील सुमारे पाच लाख मुलींना मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. याआधी सरकारने विद्यार्थिनींसाठी दरमहा सहा हजार रुपयांचा निर्वाह भत्ता सुरू केला होता. त्यानंतर आता 'कमवा आणि शिका' योजनेमुळे त्यांना शिक्षणासाठी आणखी आर्थिक आधार मिळणार आहे. मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या अडचणी कमी करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. 'कमवा आणि शिका' योजना ही त्यासाठी महत्त्वाची ठरेल, असे मत व्यक्त केले जात आहे.
सरकारने या योजनेची घोषणा केल्याने आम्हाला अतिशय आनंद झाला आहे. या योजनेची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी. यामुळे आम्हाला देखील थोडेफार काम करून आर्थिक मोबदला मिळाल्याचे समाधान मिळेल.
- मानसी सावंत, विद्यार्थिनी