लोकसभा निवडणूक: मुंबईत ५४३ ज्येष्ठ नागरिकांचे गृह मतदान; ९ दिव्यांग मतदारांचे गृह मतदान

By संतोष आंधळे | Published: May 15, 2024 10:22 PM2024-05-15T22:22:51+5:302024-05-15T22:24:17+5:30

मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये गृह मतदानाला सुरुवात

Lok Sabha Election 2024 543 senior citizens and 9 Disabled voting from home in Mumbai | लोकसभा निवडणूक: मुंबईत ५४३ ज्येष्ठ नागरिकांचे गृह मतदान; ९ दिव्यांग मतदारांचे गृह मतदान

लोकसभा निवडणूक: मुंबईत ५४३ ज्येष्ठ नागरिकांचे गृह मतदान; ९ दिव्यांग मतदारांचे गृह मतदान

संतोष आंधळे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: निवडणूक आयोगाने  प्रथमच ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार यांना टपाली मतदान पथकामार्फत टपाली मतपत्रिकेद्वारे गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये गृह मतदानाला सुरुवात झाली असून आतापर्यंत ५४३ ज्येष्ठ नागरिक व ०९ दिव्यांग मतदारांनी गृह मतदानाद्वारे आपल्या मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली.

 मुंबई दक्षिण मध्य विधानसभा मतदारसंघात अर्ज केलेल्या ३१० ज्येष्ठ नागरिक मतदारांनी तर ९ दिव्यांग मतदारांनी गृह मतदानाच्या सुविधेचा लाभ घेत टपाली मतपत्रिकेद्वारे घरून मतदान केले. मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात २३३ ज्येष्ठ नागरिक मतदारांनी या सुविधेचा लाभ घेत घरून मतदान केले आहे. दोन्ही लोकसभा मतदारसंघात सोमवार पासून गृह मतदानास सुरुवात झाली. त्या अनुषंगाने संबंधित विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विधानसभा मतदारसंघ निहाय २ टीमची नियुक्ती केली आहे. सदर टीम मतदारांच्या घरी जाऊन त्यांचे मतदान नोंदवून घेत आहे.

मुंबई दक्षिण लोकसभा मतदार संघात ७७३ ज्येष्ठ नागरिक व ४८ दिव्यांग मतदारांनी गृह मतदानासाठी नोंदणी केली असून ३०-मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात ६०४ ज्येष्ठ नागरिक व २९ दिव्यांग मतदारांनी गृह मतदानासाठी नोंदणी केली आहे, अशी माहिती यादव यांनी दिली.

१९७४ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे टपाली मतदान

मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात निवडणूक कर्तव्यावर कार्यरत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या टपाली मतदानाला सोमवार, १४ मे पासून प्रारंभ झाला असून पहिल्या दिवशी १९७४ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी टपाली मतपत्रिकेद्वारे आपल्या मतदानाचा हक्क बजावला.मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात निवडणूक कामकाजासाठी कार्यरत   निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेले अत्यावश्यक सेवेतील १३७३ कर्मचारी (पोलिस व इतर) यांनी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान केले. तर मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात ६०१ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी (पोलिस व इतर) यांनी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाचा हक्क बजावला. १६ मे  पर्यंत सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी (पोलीस व इतर) यांना टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध आहे.

Web Title: Lok Sabha Election 2024 543 senior citizens and 9 Disabled voting from home in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.