मुंबईमधील भाऊचा धक्का येथे स्थानिक मच्छिविक्रेत्या महिलांना बांगलादेशी आणि रोहिंग्यांकडून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, याबाबतची माहिती मिळताच भाजपा नेते आणि राज्य सरकारमधील मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी भाऊचा धक्का येथे जात महिला मच्छिविक्रेत्यांची भेट घेतली. तसेच स्थानिक मच्छिविक्रेत्यांचा पारंपरिक व्यवसाय बळकावू पाहणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.
मला इथे यावं लागणं हे आपल्या सर्वांचं अपयश आहे. या लोकांना कशाला परवानगी देता, हे लोक आपले कधीच होणार नाहीत, असे सांगत नितेश राणे यांनी भाऊचा धक्का येथील स्थानिक मच्छीमार बांधवांचा पारंपरिक व्यवसाय गिळंकृत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
त्यानंतर प्रसारमाध्यांसी संवाद साधताना नितेश राणे म्हणाले की, काही दिवसांपूर्वी येथील स्थानिक मच्छिविक्रेत्या महिलांनी मला आणि हिंदुत्ववादी संघटनांना एक पत्र लिहिलं होतं. तसेच इथे बांगलादेशी आणि रोहिंगे अवैध पद्धतीने मनमानी करून स्थानिक मच्छिविक्रेत्या महिलांना व्यवसाय करू देत नाहीत. आमच्या एका भगिनीवर हात उचलण्याची हिंमत त्यांच्यापैकी एकाने केली. त्याबाबत आमच्याकडे तक्रार आली होती. त्यानंतर आज आम्ही हिंदुत्ववादी कार्यकर्ते इथे जमलो होतो. आमच्या केंद्र आणि राज्य सरकारने रोहिंग्या आणि बांगलादेशीसाठी कडक नियम लागू केले आहेत. कुठलाही बांगलादेशी आणि रोहिंग्या आमच्या देशामध्ये राहता कामा नये, अशी स्पष्ट भूमिका सरकारने घेतली आहे. त्यामुळे अशा लोकांची वळवळ आम्ही भाऊचा धक्का येथे सहन करणार नाही, असा इशारा नितेश राणे यांनी दिला.