Join us

वसई-नायगावदरम्यान सिग्नल दुरुस्ती करताना लोकलची धडक; अधिकारी, दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 14:35 IST

अपघात प्रकरणी पश्चिम रेल्वेनेही चौकशीचे आदेश दिले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे): वसई ते नायगाव या दरम्यान वसई रोड स्थानक परिसरात रेल्वे सिग्नलची दुरुस्ती करत असताना दोन्ही रुळांवर लोकल आल्याने झालेल्या अपघातात एक अधिकारी आणि दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. सिनियर सेक्शन इंजिनिअर वासू मित्रा, इलेक्ट्रीक सिग्नल मेंटेनर सोमनाथ उत्तम आणि असिस्टंट सचिन वानखेडे अशी तिघांची नावे आहेत. अपघातानंतर तातडीने आर्थिक मदत म्हणून प्रत्येकी ५५,००० रुपयांची मदत विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी दिली आहे.

वसई ते नायगाव या दरम्यान रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मार्फत रेल्वे दुरुस्तीचे काम सुरू होते. लोकल आल्यानंतर नेमकी गाडी कोणत्या रुळावर येईल असा गोंधळ कर्मचाऱ्यांचा झाला. याच वेळी गाडीची धडक लागून तीन रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वसई रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून अपघाती मृत्यूची नोंद केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन इंगवले यांनी दिली. विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि इतर वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. १५ दिवसांच्या आत मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान आणि इतर देयके वितरीत केली जाणार आहेत. सिनियर सेक्शन इंजिनिअर वासू मित्रा यांच्या कुटुंबीयांना अंदाजे १.२४ कोटी तर इलेक्ट्रीक सिग्नल मेंटेनर सोमनाथ उत्तम आणि असिस्टंट सचिन वानखेडे यांच्या कुटुंबीयांना सुमारे ४० लाखांची मदत दिली जाणार आहे. तसेच, या अपघात प्रकरणी पश्चिम रेल्वेनेही चौकशीचे आदेश दिले आहेत.

 

टॅग्स :अपघातरेल्वेमृत्यू