नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 06:39 IST2025-12-26T06:38:31+5:302025-12-26T06:39:00+5:30
मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी भाजप, शिंदेसेना, उद्धवसेना, मनसे व काँग्रेस या पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी ताकद लावली आहे.

नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महायुतीतील भाजप व शिंदेसेनेचे जागावाटप अद्याप गुलदस्त्यात आहे, तर उद्धवसेना व मनसे युतीचे आधीपासूनच संकेत मिळाल्याने दोन्ही पक्षांमध्ये उमेदवारी मिळण्यासाठी इच्छुकांमध्ये कमालीची चुरस आहे. मुंबई महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास केवळ चार दिवस शिल्लक असतानाच आपल्या नातेवाईकांना उमेदवारी मिळावी यासाठी अनेक दिग्गजांची लॉबिंग सुरू आहे. त्यामुळे कुणाला उमेदवारी मिळून महापालिकेच्या रिंगणात कुणाचे नशीब फळफळणार याची उत्सुकता
लागली आहे.
मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी भाजप, शिंदेसेना, उद्धवसेना, मनसे व काँग्रेस या पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी ताकद लावली आहे. पाचही प्रमुख पक्षांकडे मुंबईच्या २२७ जागांसाठी हजारहून अधिक इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. एकाच प्रभागात अनेक दावेदार असल्याने कुणाला उमेदवारी द्यावी हा प्रश्न सर्वच पक्षांना पडला आहे. उद्धवसेना व मनसेमध्ये इच्छुकांची संख्या तुलनेने वाढली आहे. दिग्गज नेते आपल्या नातेवाईकांच्या तिकीटासाठी सक्रिय आहेत.
वॉर्ड क्रमांक १४ मधून भाजपचे महामंत्री गणेश खणकर हे त्यांच्या पत्नी कविता साठी प्रयत्न करत आहेत. त्यांचे असलेही काम या मतदारसंघात नाही केवळ गणेश खणकर यांच्या हट्टपोटी त्यांच्या पत्नीला उमेदवारी देण्याला स्थानिक भाजप नेत्यांचा व पदाधिकाऱ्यांचाही विरोध असल्याच्या तक्रारी पक्षश्रेष्ठींकडे पाठवल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
प्रयत्न कुणाचे?
उद्धवसेनेचे अनेक आजी-माजी आमदार, खासदार व दिग्गज नेत्यांनी आपल्या मुला-मुलींसह सून, जावई यांच्यासाठी उमेदवारी मिळवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. उद्धवसेनेचे खा. संजय पाटील, माजी आ. दगडू सकपाळ, माजी आ. विनोद घोसाळकर, आ. सुनील प्रभू, आ. सचिन अहिर, माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी आपल्या मुला-मुलींसाठी, तर आ. अजय चौधरी यांनी सुनेच्या उमेदवारीसाठी तयारी सुरू केली आहे.
नाराजी वाढू नये म्हणून...
उद्धवसेना व मनसेच्या युतीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे. मात्र, उमेदवारी वाटपामुळे नाराजी वाढू न देण्याचे मोठे आव्हान उद्धवसेनेसमोर आहे.
या सर्व घडामोडींमुळे पक्षातील जुने, निष्ठावंत व स्थानिक पातळीवर काम करणारे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. या नेतेमंडळीच्या नातलगांना उमेदवारी दिली जाणार की संघटनेतून घडलेल्या कार्यकर्त्यांना, याकडे सर्वांचे लक्ष लागले.