LMOTY 2023: आवडते नेते कोण?, PM मोदी की पवार साहेब?; राज ठाकरे म्हणाले बाळासाहेब!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 10:06 IST2023-04-27T09:58:31+5:302023-04-27T10:06:37+5:30
LMOTY 2023: 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर' पुरस्कार सोहळ्यात राज ठाकरे यांची मुलाखत खासदार अमोल कोल्हे व बँकर अमृता फडणवीस यांनी घेतली.

LMOTY 2023: आवडते नेते कोण?, PM मोदी की पवार साहेब?; राज ठाकरे म्हणाले बाळासाहेब!
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जपून राहावं, असा सल्ला मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिला आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीकडे लक्ष देण्याचा सल्ला राज ठाकरे यांनी दिला. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर' पुरस्कार सोहळ्यात राज ठाकरे यांची मुलाखत खासदार अमोल कोल्हे व बँकर अमृता फडणवीस यांनी घेतली. दोघांनीही राज ठाकरेंवर वेगवेगळ्या प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र, राज ठाकरेंनी आपल्या 'ठाकरी' शैलीत त्यांच्या प्रश्नांचे चेंडू सीमेपार टोलवले.
राज ठाकरेंना यावेळी तुमचे आवडते नेते कोण?, पंतप्रधान नरेंद्र मोदी कि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार?, असा सवाल अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला. यावर तसं फार कोण नाही. याचं कारण म्हणजे मी लहानपणापासून आदराने पाहत आलो ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यापैकी कोणता नेता आवडतो, यापेक्षा मी दोघांच्या कामाची तुलना करु शकले, असं राज ठाकरेंनी सांगितलं.
दोघांमध्ये जर बघायला गेलो तर नरेंद्र मोदी आणि शरद पवार दोघेही कामाला वाघ आहेत, असं कौतुक राज ठाकरेंनी केलं. राजकीय एखादी भूमिका मला न आवडणं, मला न पटणं हे स्वभाविक आहे. याच्यासाठी आपण त्या व्यक्तींवर फुल्ली मारत नाही. मी ज्यावेळी नरेंद्र मोदींवर देखील टीका करत होते, ती टीका नरेंद्र मोदींवर केलेली नाही, तर त्यांनी घेतलेल्या भूमिकेवर केली होती, असं राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
दरम्यान, कोल्हे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांचा वारसा सांगत राज यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेवरून त्यांना छेडले असता राज म्हणाले की, माझ्या आजोबांच्या वेळची परिस्थिती व आताची परिस्थिती यात जमीन अस्मानाचे अंतर आहे. मी धर्मवेड नाही. माझे अनेक मित्र मुसलमान आहेत. मशिदीवरील भोंग्यामुळे मुस्लिमांनाही त्रास होतो. माहीम येथील अनधिकृत बांधकामाला विरोध केल नसता तर तेथे दुसरे हाजीअली उ राहिले असते. आपला महाराष्ट्रातील पोलिसांच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे, असं राज ठाकरेंनी सांगितलं.
कुणाचा बायोपिक यावा?
बायोपिक करण्याकरिता माणूस तेवढा तोलामोलाचा हवा, असे सांगून राज म्हणाले की, इंदिरा गांधी, अमिताभ बच्चन, लता मंगेशकर यांच्यावर बायोपिक केला जाऊ शकतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर जागतिक दर्जाचा तीन भागांतील चित्रपट निर्माण करण्याचे काम सुरू केले आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या चित्रपटात आंतरराष्ट्रीय दर्जाचे लोक काम करतील.