LMOTY 2018 : अक्षय कुमारच्या सामाजिक जाणिवेला 'लोकमत'चा मानाचा मुजरा, विशेष पुरस्काराने गौरव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2018 09:39 IST2018-04-10T20:23:52+5:302018-04-11T09:39:23+5:30
बॉलीवूडचा स्टार अभिनेता अक्षय कुमार त्याच्या सामाजिक जाणिवेसाठी प्रसिद्ध आहे. अक्षयने टॉयलेट एक प्रेमकथा, पॅडमॅन अशा चित्रपटांमधून स्वच्छता आणि आरोग्यासंबंधी विषयांना हात घालून जनजागृतीचे काम केले आहे.

LMOTY 2018 : अक्षय कुमारच्या सामाजिक जाणिवेला 'लोकमत'चा मानाचा मुजरा, विशेष पुरस्काराने गौरव
मुंबई - बॉलीवूडचा स्टार अभिनेता अक्षय कुमार त्याच्या सामाजिक जाणिवेसाठी प्रसिद्ध आहे. अक्षयने टॉयलेट एक प्रेमकथा, पॅडमॅन अशा चित्रपटांमधून स्वच्छता आणि आरोग्यासंबंधी विषयांना हात घालून जनजागृतीचे काम केले आहे. तसेच आपल्या संस्थेच्या माध्यमातून तो आजी माजी सैनिकांना, शहिदांच्या कुटुंबीयांना सातत्याने मदतीचा हात देत असतो. सामाजिक क्षेत्रातील या योगदानासाठी अक्षय कुमारला मंगळवारी झालेल्या 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार सोहळ्यात 'सोशल इन्फ्लूएन्सर' या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अक्षयला यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराचे हे पाचवे पर्व आहे. राजकारण, समाजसेवा, कला, क्रीडा, प्रशासन, उद्योग अशा विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिलेदारांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. मान्यवर परीक्षकांनी केलेले मूल्यमापन आणि वाचकांचा कौल या आधारे हा विजेता निश्चित करण्यात येतो. वरळीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये सुरू असलेल्या दिमाखदार सोहळ्यात अक्षय कुमारला सन्मानित करण्यात आले.
अक्षय कुमारने गेल्या काही काळात सामाजिक भान जपत विविध विषयांना आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून वाचा फोडली आहे. गतवर्षी 'टॉयलेट एक प्रेमकथा' या चित्रपटामधून अक्षयने शौचालयाबाबत जनजागृती केली होती. आरोग्य आणि महिलांच्या आत्मसन्मानाच्या दृष्टीने शौचालयाचे असलेले महत्त्व त्याने पडद्यावरून मांडले होते. तर यावर्षी प्रदर्शित झालेल्या 'पॅडमॅन' या चित्रपटामधून महिलांची मासिक पाळी आणि सॅनिटरी पॅड याबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न त्याने केला होता.