विमानाप्रमाणे बटण दाबताच चालक म्हणेल, काय मदत हवी?, प्रवाशांच्या हस्ते ई-बसचे लोकार्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 11:00 IST2023-05-19T10:56:23+5:302023-05-19T11:00:26+5:30
छत्रपती संभाजीनगर ते पुणे मार्गावर सुरू करण्यात आलेली ही ई-बस पहिल्याच दिवशी प्रवाशांनी भरून धावली.

विमानाप्रमाणे बटण दाबताच चालक म्हणेल, काय मदत हवी?, प्रवाशांच्या हस्ते ई-बसचे लोकार्पण
छत्रपती संभाजीनगर : विमानात प्रवाशाने बटण दाबताच मदतीसाठी एअर होस्टेस जातात. अगदी अशाप्रकारे एसटी महामंडळाच्या बसमध्येही बटण दाबताच आवश्यक असलेल्या मदतीसाठी चालक प्रवाशांजवळ जाईल. यासह अनेक अत्याधुनिक सोयीसुविधा असलेल्या ‘एसटी’च्या ‘शिवाई’ या ई-बसचे गुरुवारी प्रवाशांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर ते पुणे मार्गावर सुरू करण्यात आलेली ही ई-बस पहिल्याच दिवशी प्रवाशांनी भरून धावली.
या बसचे पहिले तिकीट काढणारे प्रा. एन. टी. ठाकरे आणि मनीषा ठाकरे यांच्या हस्ते बसचे पूजन करून आणि फीत कापून बससेवेचे उद्घाटन करण्यात आले. महत्वाचे म्हणजे, दीड तासातच या बसची १००% बॅटरी चार्ज होते.
५ हजार १५० ई-बस लवकरच धावणार
राज्यभरात आगामी कालावधीत ५ हजार १५० इलेक्ट्रिक बस धावणार आहेत. या बसचा लूक एकदम हटके आहे. ही बस सर्वांच्या पसंतीस पडेल, असा विश्वास प्रवाशांनी व्यक्त केला.
सुविधा -
वायफाय, दोन स्क्रीन, आरामदायक आसनव्यवस्था, प्रत्येक आसनाजवळ मोबाइल चार्जिंग सुविधा, स्वतंत्र लाइट, स्वयंचलित दरवाजा, ६ सीसीटीव्ही कॅमेरा
प्रत्येक आसनाजवळ स्वतंत्र लाइट, बटण दाबताच मदत मिळेल, अशी सुविधा आहे. ई-बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, स्क्रीन आहे.