Join us  

सावरकरांना भारतरत्न मिळावे म्हणून सर्वांनी प्रयत्न करूया, विधानसभेत अजित पवार यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 1:30 PM

Ajit Pawar : सावरकर यांना भारतरत्न देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या पत्रावर पुढे काय कारवाई झाली

ठळक मुद्देसावरकरांचे योगदान कुणीही नाकारू शकत नाहीसावरकरांना भारतरत्न मिळावे यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे सावरकरांनी मांडलेले काही मुद्दे विज्ञानवादी होते. सावरकरांविषयी मतमतांतरे असू शकतात

 मुंबई - स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतीदिनी त्यांच्या गौरवाचा प्रस्ताव सादर करण्यावरून आज विधानसभेत जोरदार गदारोळ झाला. एकीकडे सावकरांच्या गौरव प्रस्तावाची मागणी भाजपाने लावून धरली असताना विधानसभाध्यक्षांनी मात्र त्याला दाद दिली नाही.  दरम्यान, सावरकरांचे योगदान कुणीही नाकारू शकत नाही असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सावरकरांना भारतरत्न मिळावे यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे विधान सभागृहात केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरव प्रस्तावाची मागणी विरोधी पक्ष भाजपाने लावून घरली असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपाला प्रत्युत्तर दिले. ‘सावरकर यांनी दिलेले योगदान कुणीही नाकारू शकत नाही. त्यांनी मांडलेले काही मुद्दे विज्ञानवादी होते. सावरकरांविषयी मतमतांतरे असू शकतात. व्यक्ती तितकी मते आपल्याकडे असतात. मात्र म्हणून सावकरांचे योगदान नाकारता येत नाही,’ असे अजित पवार म्हणाले.

 आज विरोधी पक्षाकडून सावरकरांच्या गौरवाचा प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र सावरकर यांना भारतरत्न देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या पत्रावर पुढे काय कारवाई झाली, याबाबत काही पाठपुरावा झाला आहे का? आता सावरकर यांना भारतरत्न मिळावे यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करू.

दरम्यान, राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचे आज पाहायला मिळालं. भाजपाकडून वीर सावरकरांचा गौरव प्रस्ताव सभागृहात मांडण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. मात्र हा प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी फेटाळून लावला. हा प्रस्ताव  फेटाळल्याने नाराज झालेल्या भाजपा आमदारांनी गोंधळ घालत सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. 

टॅग्स :अजित पवारमहाराष्ट्र सरकारराष्ट्रवादी काँग्रेसभाजपा