मागील चार दिवसात एसटीने २ हजार २०९ बसमधून ३७ हजार ३२७ मजुरांचा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 18:44 IST2020-05-12T18:43:55+5:302020-05-12T18:44:15+5:30
२ हजार २०९ बसद्वारे रस्त्याने पायपीट करत चाललेल्या सुमारे ३७ हजार ३२७ मजुरांना त्यांच्या कुटुंबीयांसमवेत गाडीमध्ये बसवून सुखरूप राज्यांच्या सीमेपर्यंत पोहोचविले.

मागील चार दिवसात एसटीने २ हजार २०९ बसमधून ३७ हजार ३२७ मजुरांचा प्रवास
मुंबई : एसटी महामंडळाकडून इतर राज्यातील अडकलेल्या मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत आणि इतर राज्यात अडकलेले जे महाराष्ट्राच्या सीमेवर आले आहेत. त्यांना त्यांच्या जिल्ह्यात सोडण्यासाठीच एसटीची बस सेवा उपलब्ध आहे. मागील चार दिवसापासून सुरु असलेल्या या सेवेतून एसटी महामंडळाने विविध आगारातील तब्बल २ हजार २०९ बसद्वारे रस्त्याने पायपीट करत चाललेल्या सुमारे ३७ हजार ३२७ मजुरांना त्यांच्या कुटुंबीयांसमवेत गाडीमध्ये बसवून सुखरूप राज्यांच्या सीमेपर्यंत पोहोचविले आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.
ठाणे,नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, नागपूर, कोल्हापूर अशा विविध विभागातील ११ मे रोजी ५३० एसटी बसद्वारे हमरस्त्यावरुन अत्यंत धोकादायक पद्धतीने पायपीट करित चाललेल्या ११ हजार ८६६ मजुरांना गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व कर्नाटकातील सीमेपर्यंत जाऊन सोडण्यात आले. ९ मे ते ११ मे कालावधीत २१ हजार ७१४ मजूरांना त्यांच्या इच्छित स्थळी सुखरूप पोहोचविण्यात आले आहे. तर, १२ मे रोजी सायंकाळी ५ वाजेपासून ५६३ बसमधून १२ हजार ४५९ मजुरांनी राज्याच्या सीमेपर्यंत प्रवास केला.
भर उन्हात पायपीट करीत चाललेल्या या हजारो मजुरांना एसटी बसेस मध्ये बसवुन, फिजिकल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करीत राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यात, एसटी कर्मचाऱ्यांनी मोलाची कामगिरी बजावत आहेत. त्यामुळे हे सर्व कर्मचारी कौतुकास पात्र आहेत, असे .परब यांनी एसटी कर्मचाऱ्या बद्दल गौरव उद्गार काढले आहेत. याबरोबर काही ठिकाणी आवश्यकतेनुसार श्रमिकांना पिण्याचे पाणी व जेवणाची व्यवस्था देखील एसटी महामंडळाकडून करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. यापुढे देखील लाॅक-डाउन संपेपर्यंत अशाच कष्टकरी कामगार-मजूरांना सीमेपर्यंत पोहोचविण्याचे व तेथे अडकून पडलेल्या आपल्या राज्यातील श्रमिकांना सुखरूप घरी घेऊन येण्याची मोहिम एसटी महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणार आहे.तरी त्यांनी धोकादायक पद्धतीने पायपीट न करता , एसटी बसेस मधूनच सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन अनिल परब यांनी केले आहे.