परळमध्ये सिग्नलवर थांबलेल्या चिमुकल्याला बसची धडक; ४ वर्षांच्या मुलाची मृत्यूशी झुंज, चालक जामिनावर मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 16:02 IST2026-02-11T15:51:29+5:302026-02-11T16:02:15+5:30

मुंबईत बसची धडक बसल्यामुळे एक चिमुकला गंभीररित्या जखमी झाला आहे.

Lalbaug Toddler Battles for Life in PICU Accused Bus Driver Walks Free on Bail Outrage in Parel | परळमध्ये सिग्नलवर थांबलेल्या चिमुकल्याला बसची धडक; ४ वर्षांच्या मुलाची मृत्यूशी झुंज, चालक जामिनावर मोकळा

परळमध्ये सिग्नलवर थांबलेल्या चिमुकल्याला बसची धडक; ४ वर्षांच्या मुलाची मृत्यूशी झुंज, चालक जामिनावर मोकळा

Mumbai Crime: मुंबईतील परळ परिसरात बुधवारी ४ फेब्रुवारी रोजी एक भीषण रस्ते अपघात घडला. सिग्नल सुटण्याची प्रतीक्षा करत असलेल्या एका दुचाकीला भरधाव शिवशाही बसने पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ४ वर्षांचा चिमुकला गंभीर जखमी झाला असून सध्या तो रुग्णालयातील अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत आहे.

लालबाग परिसरात राहणारे मंदार महेंद्र तावडे (३६) हे आपल्या ४ वर्षांच्या मुलाला, अथांगला घेऊन शाळेतून घरी परतत होते. परळ पूल उतरल्यानंतर डॉ. बी. ए. रोडवरील सेंट्रल रेल्वे वर्कशॉपसमोरील सिग्नलवर ते थांबले होते. सिग्नल सुटण्यासाठी अवघे १० ते १५ सेकंद शिल्लक असतानाच, पाठीमागून आलेल्या भरधाव शिवशाही बसने तावडे यांच्या ज्युपिटर स्कुटरला जोरदार धडक दिली.

चिमुकला 'पीआयसीयू'मध्ये, वडिलांवरही उपचार सुरू

ही धडक इतकी जोरदार होती की, चिमुकला अथांग गंभीररीत्या जखमी झाला. त्याला तातडीने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर बालरोग अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अथांगचे वडील मंदार तावडे हे देखील या अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावर फिजिओथेरपी आणि इतर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. "माझ्या मुलाची प्रकृती आता हळूहळू सुधारत आहे, पण ज्या चालकामुळे माझा मुलगा आज या अवस्थेत आहे, त्याला कठोर शिक्षा मिळायलाच हवी," अशी मागणी मंदार तावडे यांनी केली.

बसचालकाचा निष्काळजीपणा; जामिनामुळे स्थानिकांत संताप

अपघातानंतर भोईवाडा पोलिसांनी बसचालक शामराव नाथराव नगरगोजे याला अटक केली. चालकाने अत्यंत बेजबाबदारपणे आणि वेगात बस चालवल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र, अटकेनंतर चालकाला न्यायालयात हजर केले असता, त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. या बातमीमुळे परळ आणि लालबाग परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, बस चालकांच्या वाढत्या मुजोरीवर लगाम लावण्याची मागणी केली जात आहे.याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Web Title : परेल में बस ने बच्चे को टक्कर मारी; लड़का जिंदगी के लिए जूझ रहा है

Web Summary : मुंबई के परेल में एक तेज रफ्तार बस ने एक स्कूटर को टक्कर मार दी, जिससे चार साल का लड़का गंभीर रूप से घायल हो गया। ड्राइवर को गिरफ्तार किया गया लेकिन जमानत पर रिहा कर दिया गया, जिससे आक्रोश फैल गया। बच्चा आईसीयू में है।

Web Title : Bus Hits Child in Parel; Boy Battles for Life

Web Summary : A four-year-old boy is critically injured after a speeding bus hit his scooter in Parel, Mumbai. The driver was arrested but released on bail, sparking outrage. The child is in the ICU.