कुर्ला, घाटकोपर स्थानकांतील गर्दीवर उतारा काय? स्टॉल हटविलेल्या जागेचा प्रवाशांना उपयोग होईना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 18:09 IST2024-12-09T18:06:44+5:302024-12-09T18:09:01+5:30
मध्य रेल्वेची मेन लाइन, हार्बर व पश्चिम रेल्वे मार्गाच्या फलाटांवरील प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रशासनाने तेथील कॅन्टीन, खाद्यपदार्थांचे स्टॉल हटविले असले तरी प्रत्यक्षात मात्र गर्दी कमी झालेली नाही.

कुर्ला, घाटकोपर स्थानकांतील गर्दीवर उतारा काय? स्टॉल हटविलेल्या जागेचा प्रवाशांना उपयोग होईना
मुंबई :
मध्य रेल्वेची मेन लाइन, हार्बर व पश्चिम रेल्वे मार्गाच्या फलाटांवरील प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रशासनाने तेथील कॅन्टीन, खाद्यपदार्थांचे स्टॉल हटविले असले तरी प्रत्यक्षात मात्र गर्दी कमी झालेली नाही. कारण हे स्टॉल हटविलेल्या जागांचा वापर प्रवाशांना योग्य पद्धतीने करता येत नसल्याने रेल्वे प्रशासनाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर दादर, कुर्ला, घाटकोपर, तर हार्बरवर वडाळा, कुर्ला आणि गोवंडी ही गर्दीची स्थानके आहेत. पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल, दादर, लोअर परळ, अंधेरी या स्थानकांवर प्रवाशांची तुडुंब गर्दी होते. दादर हे जंक्शन असून, येथे मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्ग एकत्र येतात. त्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या गर्दीचा महापूर असतो. कुर्ला स्थानकात मेन लाइन आणि हार्बर लाइन एकत्र येते. वांद्रे-कुर्ला संकुल, मुंबई विद्यापीठात जाण्यासाठी, लोकमान्य टिळक टर्मिनसकडे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची मोठी आहे. घाटकोपर स्थानकाला मेट्रो जोडल्याने हे स्थानक गर्दीने फुललेले असते.
दादरमध्ये फलाटांचे सुशोभीकरण करताना जिन्याचे काम नव्याने हाती घेतले. याचा निश्चितच फायदा झाला. मात्र, मेन लाइनवर मेल-एक्स्प्रेसच्या फलाटांवर गर्दीचे नियंत्रण अद्याप करता आलेले नाही. कुर्ला स्थानकाच्या फलाट क्रमांक ४ वरील स्टॉल हटविले. परंतु, ती जागा समपातळीत न केल्याने त्याचा वापर होत नाही. पश्चिमेकडील तिकीट घराकडील गर्दी कमी करण्यासाठी नवीन तिकीट घर सुरू केले. परंतु फलाटावर प्रवेश करणाऱ्यांच्या मार्गातील अडथळे अद्याप कायम आहेत.
घाटकोपर स्थानकातील फलाट क्रमांक एकवरील तीन कॅन्टीन पादचारी पुलाखालील मोकळ्या जागेत हलविले आहेत. त्यामुळे फलाटावर जागा मोकळी झाली. मात्र स्टॉल जैसे थैच आहेत. फलाट क्रमांक दोन व तीनवर एक कॅन्टीन व दोन स्टॉल, तर फलाट क्रमांक चारवर तीन स्टॉल सुरू आहेत. सायन स्थानकातील फलाट क्रमांक एक, दोनवरील प्रत्येकी एक कॅन्टीन हटविण्यात आले आहेत. मात्र गर्दीचे व्यवस्थापन करण्यात प्रशासन कमी पडत असल्याचे दिसते.
- संदीप पटाडे, प्रवासी, घाटकोपर
कुर्ला सगळ्यात बकाल स्थानक आहे. केंद्र सरकारकडून मुंबईतील लोकलसाठी निधीची तरतूद होत असली तरी कुर्ल्यासारख्या मध्यवर्ती भागातील स्थानकांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून लोकप्रतिनिधींनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.
- राकेश पाटील, प्रवासी, कुर्ला