Join us

Kurla Accident: 'माझ्या डोळ्यासमोर मृतदेह पडले होते'; बस अपघाताची प्रत्यक्षदर्शीने सांगितली कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 09:22 IST

Kurla Bus Accident: मुंबईतील कुर्ला पश्चिममध्ये सोमवारी (९ डिसेंबर) बेस्ट बसचा अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर ४५ हून अधिक लोक जखमी झाले.

Kurla Bus Accident Video: 'मी रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी घरातून निघालो होतो, तितक्यात जोरात आवाज आला. मी लगेच अपघाताच्या ठिकाणी पोहोचलो. बेस्ट बसने पायी चालणाऱ्या नागरिकांना आणि वाहनांचा जोरात धडक दिली होती', हे उद्गार आहेत एका प्रत्यक्षदर्शीचे. बेस्टअपघातावेळी घटनास्थळी काय दृश्य होते याबद्दल त्यांनी माहिती दिली.    कुर्ला पश्चिम भागातील बुद्ध कॉलनीमध्ये सोमवारी (९ डिसेंबर) रात्री भयंकर अपघात झाला. बेस्ट बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुर्घटना घडली. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून, ४५ पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. या अपघाताबद्दल एका प्रत्यक्षदर्शीने माहिती दिली.  

"नागरिकांना आणि वाहनांना उडवण्यापूर्वी बेस्ट बस बेफाम धावत होती. त्यानंतर बसने नागरिक आणि वाहनांना उडवले", असे प्रत्यक्षदर्शी जैद अहमदने सांगितले. 

'माझ्या डोळ्यासमोर मृतदेह पडलेले होते'

"मी रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी निघालो. जोरात आवाज आला. मी अपघाताच्या ठिकाणी पोहोचलो आणि बघितलं, तर बेस्ट बसने पायी चालणाऱ्या लोकांना, एका रिक्षाला आणि तीन कारबरोबर इतर वाहनांना उडवले होते. माझ्या डोळ्यासमोर काही मृतदेह पडलेले होते", असे अहमद म्हणाला.

"आम्ही अपघातग्रस्त रिक्षातील प्रवाशांना बाहेर काढले. त्यांना दुसऱ्या रिक्षातून भाभा रुग्णालयात नेले. या बसने पोलिसांच्या वाहनांनाही धडक दिली", असेही या प्रत्यक्षदर्शीने सांगितले. 

सहा जणांचा मृत्यू 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातानंतर जखमींना परिसरातील वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. ४९ जणांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे. 

वाहतूक मार्गात बदल

बुद्ध कॉलनी येथे काल (९ डिसेंबर) रात्री अपघात झाला. त्यामुळे पोलिसांनी कुर्ला स्टेशन बंद केल्याने बसमार्ग ३७,320,319,325,330,365 आणि ४४६ बसेस कुर्ला आगारातून चालतील. 

तसेच सांताक्रुझ स्टेशन ते कुर्ला स्टेशन चालणारे बसमार्ग ३११,३१३ आणि ३१८ च्या बसेस टिळक नगर यु वळण घेऊन कुर्ला स्टेशन न जाता सांताक्रुझ स्टेशन जातील. 

बसमार्ग ३१० च्या बसेस पण टिळक नगर पुल येथे यु वळण मारुन बांद्रा बस स्थानक जातील. सदर परावर्तन सकाळ पहिल्या बस पासून चालू आहे.

टॅग्स :कुर्लाअपघातमुंबई पोलीसबेस्ट