Devendra Fadnavis kurla accident: मुंबईतील कुर्ला पश्चिममध्ये बेस्ट बस धडक दिल्याने 6 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 40 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत देण्याची घोषणा केली. त्याचबरोबर जखमींवरील उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्ट करेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
बेस्ट बस मार्ग क्रमांक ३३२ ही कुर्ला रेल्वे स्थानकावरून साकीनाका येथे जात होती. दरम्यान, एलबीएस मार्गावर येताच बस ब्रेक एक्सिलरेट झाल्याने चालक संजय मोरे यांचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस अपघात झाल्याची माहिती उपक्रमाकडून देण्यात आली आहे. बसने दुचाकी, रिक्षा, इको व्हॅन, पोलीस जीप, टॅक्सी अशा वाहनांना धडक दिली. त्याचबरोबर पायी जाणाऱ्या काहीजणांही उडवले.
मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला शोक
कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात काही लोकांचे मृत्यू झाले, त्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना करतो, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.
मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत
"या घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीने करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत", असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
मृतांचा आकडा पोहोचला ७ वर
कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणातील मृतांचा आकडा वाढला आहे. या घटनेत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून, काही जणांची प्रकृती अजूनही गंभीर आहे.
कन्निस अन्सारी, आफरीन शाह, अनाम शेख, शिवम कश्यप, विजय गायकवाड, फारूक चौधरी अशी मृतांची नावे असून, सातव्या मृत व्यक्तीचे नाव अद्याप प्रशासनाकडून सांगण्यात आलेले नाही.
चालक संजय मोरेला अटक
कुर्ला पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवत बेस्ट बस चालक संजय मोरे याला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपी चालक संजय मोरे याच्याकडून अवजड वाहन चालविण्याचा परवाना जप्त केला आहे.
मोरेला अन्य वाहनांसह मिनी बस चालविण्याचा अनुभव होता. पण, इलेक्ट्रिक बस चालविण्याचा अनुभव नव्हता, अशी माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे. त्यामुळे, आरोपी चालक मोरेची नियुक्ती करणाऱ्या बेस्ट प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची पोलीस चौकशी करणार आहेत.