कुणाल कामरा सत्यच बोलला, चोरी करणारे गद्दार असतात; उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 14:10 IST2025-03-24T14:09:18+5:302025-03-24T14:10:20+5:30
तोडफोड करणाऱ्यांकडून वसुली केली जावी, अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली आहे.

कुणाल कामरा सत्यच बोलला, चोरी करणारे गद्दार असतात; उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल
Shiv Sena Uddhav Thackeray: "कुणाल कामरा सत्य बोलला आहे. त्याने जनभावना मांडली आहे. जे चोरी करतात ते गद्दारच असतात," असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'कॉमेडी शो'मुळे निर्माण झालेल्या वादावर आपली भूमिका मांडली आहे. यावेळी उद्धव यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता खरमरीत टीकाही केली आहे.
"महाराष्ट्राच्या जनतेला मी स्पष्ट करू इच्छितो की, काल कॉमेडी शोच्या सेटची जी तोडफोड करण्यात आली ती शिवसैनिकांकडून करण्यात आलेली नाही. त्याचा शिवसेनेशी कसलाही संबंध नाही. ती तोडफोड एसंशि गटाने (शिंदेसेना) केली असेल. आपलं जे राज्य चाललंय ते शिवरायांच्या आदर्शावर चाललंय की गद्दारांच्या आदर्शावर चाललं आहे? जे भेकड लोक आहेत ते त्यांच्या गद्दार नेत्याचा अपमान झाला म्हणून तोडफोड करत आहेत. पण या गद्दार लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोरटकर दिसत नाही, राहुल सोलापूरकर दिसत नाही, कोश्यारींनी अपमान केला तेव्हाही यांनी निषेध केला नाही," असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला आहे.
"तोडफोड करणाऱ्यांकडून नुकसान भरपाई वसूल करा"
एकनाथ शिंदे यांच्यावर गाण्यातून झालेल्या टीकेनंतर संतापलेल्या कार्यकर्त्यांनी जिथं शोचं चित्रीकरण झालं त्या सेटची तोडफोड केली. ही तोडफोड करणाऱ्यांकडून वसुली केली जावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. "मुख्यमंत्री महोदयांनी मी सांगू इच्छितो, न्याय सगळ्यांनाच सारखा पाहिजे. नागपूरच्या दंगलीत ज्यांचं नुकसान झालं त्यांना तुम्ही नुकसान भरपाई देणार आहात. तशीच नुकसान भरपाई काल कॉमेडी शोच्या सेटच्या झालेल्या तोडफोडीनंतर दिली पाहिजे. तसंच ज्या गद्दार भेकड लोकांना छत्रपती शिवरायांचा अपमान चालतो पण आपल्या गद्दार नेत्याचा अपमान चालत नाही, अशा ज्या लोकांनी काल तोडफोड केली त्यांच्याकडून दामदुप्पटीने नुकसान भरपाई वसूल करा," असं ठाकरे म्हणाले.
दरम्यान, "महाराष्ट्रात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं काही चालत नाही, असं दाखवण्यासाठी एकनाथ शिंदेंकडून हा सगळा प्रकार केला जात आहे," असा आरोपही यावेळी उद्धव ठाकरेंनी केला आहे.
"...तेव्हा साधा चहाचा ग्लास फोडताना तरी दिसले का?"
कुणाल कामरा वादाबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सोशल मीडिया पेजवरूनही एकनाथ शिंदेंना लक्ष्य करण्यात आलं आहे. "एकनाथ शिंदेंवर टीका केली म्हणून स्टुडिओ फोडणारे कावळे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आक्षेपार्ह बोललं गेलं, तेव्हा साधा चहाचा ग्लास फोडताना तरी दिसले का? यांचं हिंदुत्व केवळ कॉन्ट्रॅक्टर आणि खोक्यांपुरतं मर्यादित आहे का?" असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आला आहे.