तिसऱ्या मुंबईच्या पायाभूत सुविधांसाठी कोरियाचा हातभार, कुठे असेल तिसरी मुंबई?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 11:10 IST2025-04-19T11:05:47+5:302025-04-19T11:10:42+5:30

Third mumbai city plan: तिसऱ्या मुंबईची निर्मिती तसेच पायाभूत सुविधांच्या विकासासाठी दक्षिण कोरियाचे उच्चाधिकारी आणि तज्ज्ञांसोबत एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली.

Korea's contribution to the infrastructure of the third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या पायाभूत सुविधांसाठी कोरियाचा हातभार, कुठे असेल तिसरी मुंबई?

तिसऱ्या मुंबईच्या पायाभूत सुविधांसाठी कोरियाचा हातभार, कुठे असेल तिसरी मुंबई?

मुंबई : ‘व्हिजन मुंबई ३.०’ नुसार भविष्यातील नाविन्यपूर्ण व सर्वसमावेशक तिसरी मुंबई हे महानगर घडविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पुढचे पाऊल उचलले असून, त्यात दक्षिण कोरियाचा मुख्य सहभाग राहणार आहे. जागतिक दर्जाच्या या स्मार्ट सिटीच्या निर्माणासाठी दक्षिण कोरियाने गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे. 

तिसऱ्या मुंबईची निर्मिती तसेच पायाभूत सुविधांच्या विकासासाठी दक्षिण कोरियाचे उच्चाधिकारी आणि तज्ज्ञांसोबत एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. त्यात ट्रांझिट-ओरिएंटेड डेव्हलपमेंट प्रकल्प, मिश्र वापराच्या टाउनशिप्स, तंत्रज्ञान पार्क, औद्योगिक क्लस्टर्स, लॉजिस्टिक्स हब्ज, डेटा सेंटर्स, फिनटेक इनक्युबेशन हब्ज आणि परवडणाऱ्या गृहनिर्माण क्षेत्रातील गुंतवणुकींच्या संधींवर चर्चा करण्यात आली. 

बैठकीला एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्यासह एमएमआरडीएचे उच्चपदस्थ अधिकारी, दक्षिण कोरियाच्या सरकारमधील उच्चपदस्थ, उद्योजक, शहर नियोजनकार व शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आदी मान्यवर उपस्थित होते. 

कुठे असेल तिसरी मुंबई ?

अटल सेतूच्या प्रभाव क्षेत्रात एमएमआरडीएकडून तिसरी मुंबई वसविली जाणार आहे. त्यात हायटेक व्यवसाय उद्योग, फिनटेक झोन, तसेच हरित क्षेत्राचा समावेश असेल.

यात सहकार्य वाढणार

तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एकात्मिक शहरी विकासाच्या माध्यमातून इंचेऑनला १०० अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था करणाऱ्या आयएफईझेडकडून मार्गदर्शन घेणे.

लॉजिस्टिक्स, ट्रान्झिट हब्ज आणि नवकल्पना क्षेत्रांसाठी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आयएफईझेडचे गुंतवणूकदार नेटवर्क्स आणि कोट्राच्या प्रचार माध्यमांचा उपयोग करणे.

डेटाचे सुयोग्य व सुरक्षित पद्धतीने व्यवस्थापन, शहराचे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित व्यवस्थापन, हरित वाहतूक यंत्रणा, फिनटेक झोन आणि स्मार्ट हाऊसिंग क्लस्टर्ससाठी कोरियन मॉडेल्सचा उपयोग. शहरी नवकल्पनांची देवाणघेवाण केली जाणार आहे.

इंचिऑन फ्री इकॉनॉमिक झोन (आयएफईझेड), कोरिया ट्रेड इन्व्हेस्टमेंट प्रमोशन एजन्सी (केओटीआरए) व वर्ल्ड स्मार्ट सिटीज फोरम (डब्लूएससीएफ) यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांशी सहकार्य केल्याने स्मार्ट प्रशासन, उच्च-तंत्रज्ञान पायाभूत सुविधा व गुंतवणूक परिसंस्था यात जागतिक दर्जाची तज्ज्ञता मिळेल. -डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीए

Web Title: Korea's contribution to the infrastructure of the third Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.