कोल्हापुरी चप्पलचा वाद न्यायालयात; ‘प्राडा’ला भरपाईचे आदेश द्यावेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 13:31 IST2025-07-05T13:30:41+5:302025-07-05T13:31:13+5:30
उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे मागणी

कोल्हापुरी चप्पलचा वाद न्यायालयात; ‘प्राडा’ला भरपाईचे आदेश द्यावेत
मुंबई : कोल्हापुरी चपलांची ‘प्रेरणा’ घेत इटालियन लक्झरी फॅशन ब्रँड ‘प्राडा’ने बनवलेले फूटवेअर २२ जून रोजी मिलानमधील ‘स्प्रिंग/समर मेन्स कलेक्शन’मध्ये सादर केल्यानंतर निर्माण झालेला वाद आता खूप वाढला आहे. याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटल्यावर काही दिवसांनी कंपनीने मौन सोडले असतानाच, कोल्हापुरी चपलांच्या कारागिरांना नुकसानभरपाई मिळावी, यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
‘प्राडा’ने मेन्स फॅशन शोमध्ये सादर केलेल्या ‘टो-रिंग’ फूटवेअर म्हणजे कोल्हापूर चपलांची कॉपी आहे. या कंपनीने आपल्या चपला बाजारात आणताना एक निवेदन जाहीर करत त्यात संबंधित उत्पादनामागील प्रेरणा भारतीय कारागिरांकडून घेतल्याचे नमूद केले होते.
या सँडल्सच्या डिझाईन आणि वैशिष्ट्यांमध्ये भौगोलिक मानांकन (जीआय) प्राप्त कोल्हापुरी चपलांशी ठळक साम्य आहे. आंतरराष्ट्रीय फॅशन शोमध्ये १ लाखाहून अधिक किंमत असलेल्या या सँडलचे प्रदर्शन करण्यात आले. या चपलांचे खरे मूळ मान्य न करता त्याचे युरोपियन लेबलखाली पुन्हा ब्रँड करण्यात आले आहे. तसे करून कंपनीने भारतीय कारागिरांच्या आर्थिक व मूलभूत हक्कांचे उल्लंघन केले आहे, असे प्रा. ॲड. गणेश हिंगमिरे यांच्यासह अन्य वकिलांनी जनहित याचिकेद्वारे न्यायालयाच्या निदर्शनास आणले.
कोल्हापुरी चपलांशी लोकांच्या भावना जोडलेल्या आहेत. ब्रँडने यासंदर्भात दिलेली कबुली ना सार्वजनिक होती ना अधिकृत. ती केवळ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर टीका झाल्यानंतरच देण्यात आली. त्यामुळे याप्रकरणी इटालियन लक्झरी ब्रँडने सार्वजनिक माफी मागावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.