Join us  

“याचिकांवर स्वतंत्र सुनावणी घ्या”; शिंदे गट ठाम, ठाकरे गटाचा नकार, विधिमंडळात काय घडले?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 5:40 PM

Mla Disqualification Case: विधिमंडळात घेण्यात आलेल्या सुनावणीत शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला.

Mla Disqualification Case: शिवसेना शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधिमंडळात सुनावणी झाली. तब्बल अडीच तास युक्तिवाद करण्यात आला. या सुनावणीवेळी सर्व याचिकांवर स्वतंत्र सुनावणी घ्यावी, या मागणीवर शिंदे गट ठाम असून, हा वेळकाढूपणा आहे, सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्यावी, अशी मागणी ठाकरे गटाने लावून धरली आहे. तीन अर्जांवर झालेल्या सुनावणीसंदर्भात आता २० तारखेला निकाल दिला जाणार आहे. 

आमदार अपात्रतेसंदर्भात एकत्र सुनावणी व्हावी, काही अधिकची कागदपत्रे द्यायची आहेत, कागदोपत्री पुरावा रेकॉर्डवर घ्यावा आणि अतिरिक्त मुद्दे उपस्थित करायचे आहेत, असे तीन अर्ज करण्यात आले होते. यावर चर्चा होऊन याबाबत २० तारखेला निर्णय दिला जाणार आहे. आमचा म्हणणे आहे की वेगवेगळ्या याचिका मध्ये वेगवेगळे मुद्दे आहेत. आमदारांना मुद्दे मांडायचे आहेत. प्रत्येकाला मुद्दे मांडण्याची संधी मिळावी, असा युक्तिवाद करण्यात आला. 

मुद्दे वेगळे असताना याचिका एकत्र करण्याच्या मागणीवर निकाल कसा देता येईल

उद्धव ठाकरे गटाकडून खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, आमदार अजय चौधरी आणि शिवसेना ठाकरे गटाचे वकील विधान भवनात उपस्थित होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून  केवळ त्यांचे वकील उपस्थित होते. सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घेऊ नका, या भूमिकेवर शिंदे गटाचे वकील ठाम राहिले. प्रत्येक याचिकेची कारणे वेगळी आहेत त्यामुळे प्रत्येक याचिकेवर स्वतंत्र सुनावणी घ्यावी, अशी मागणी शिंदे गटाने केली. यावर, सर्व याचिका एकत्र घ्या, असे ठाकरे गटाकडून सांगण्यात आले. प्रत्येक याचिकेतील मुद्दे वेगळे असताना याचिका एकत्र करण्यासंदर्भातील मागणीवर निकाल कसा देता येईल, असे मत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मांडले. या सुनावणीवेळी याचिका एकत्र करण्याच्या मुद्द्यावर ठाकरे गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. ठाकरे गटातील प्रत्येक वकिलाकडून मुद्देसूद मांडणी करण्यात आली. तर ठाकरे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद शिंदे गटाकडून खोडून काढला जात होता. 

दरम्यान, आमदार अपात्रतेच्या २३ नोव्हेंबरपर्यंत युक्तिवाद होणार आहे. यानंतर दोन आठवड्यात अंतिम सुनावणी होणार असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे, या सुनावणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती आहे. सर्वोच्च सुनावणी आधी या प्रकरणावर दिल्लीत कायदेशीर खलबते होणार असल्याची चर्चा आहे. राहुल नार्वेकर दिल्लीत सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची भेट घेणार असल्याचे समजते. 

टॅग्स :महाराष्ट्रातील सत्तासंघर्षविधानसभाराहुल नार्वेकरशिवसेनाएकनाथ शिंदेउद्धव ठाकरे