ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 15:57 IST2025-12-26T15:53:25+5:302025-12-26T15:57:38+5:30
Prashant Jagtap Political Career News: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा राजीनामा दिल्यानंतर आता प्रशांत जगताप यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
Prashant Jagtap Political Career News: विधानसभा निवडणूक निकालानंतर महायुतीत प्रवेश करणाऱ्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची संख्या मोठा प्रमाणात वाढली. परंतु, यानंतर आता याचाच दुसरा टप्पा पाहायला मिळत आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात वेगवेगळी समीकरणे जुळून येत आहेत. यासंदर्भातही अनेकांनी पक्ष सोडल्याचे दिसत आहे. यातील एक नाव म्हणजे पुण्याचे प्रशांत जगताप. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवण्याचे संकेत मिळताच प्रशांत जगताप यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत अजित पवार आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवणार असल्याबाबत चर्चांना सुरुवात झाली. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते याबाबत बैठका घेत असून, काका-पुतणे एकत्रितपणे निवडणुका लढवू शकतात, असा कयास बांधला जात आहे. मुंबईत ठाकरे बंधूंनी अधिकृतपणे युती घोषित केल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यालाही बळ मिळाले आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित निवडणुका लढवू शकतात, असे संकेत मिळताच प्रशांत जगताप यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आणि तत्काळ पक्षातील पदाचा राजीनामा दिला.
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले
प्रशांत जगताप कोणत्या पक्षात जाणार यावरही राजकीय वर्तुळात बराच खल झाला. उद्धव ठाकरे यांनी प्रशांत जगताप यांना फोन करून पक्षात घेण्याबाबत सकारात्मकता दाखवली. तसेच दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनीही प्रशांत जगताप यांच्याशी संपर्क साधल्याची चर्चा ऐकिवात आहे. परंतु, या सगळ्याला छेद देत प्रशांत जगताप यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत प्रशांत जगताप यांचा प्रवेश झाला.
प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
- प्रशांत जगताप यांनी १९९९ पासून मूळ एकसंध राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कामाला सुरुवात केली.
- पुणे महानगरपालिकेत प्रदीर्घ काळ नगरसेवक म्हणून काम केले आहे. २००७,२०१२ आणि २०१७ या तिन्ही महापालिका निवडणुकीत प्रशांत जगताप निवडून आले.
- २०१६-१७ या कालावधीत प्रशांत जगताप पुणे शहराचे महापौर म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
- २०२१ मध्ये प्रशांत जगताप यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
- शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून प्रशांत जगताप यांची ओळख आहे.
- २०२३ मध्ये पक्षात फूट पडल्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटात राहण्याचा निर्णय घेतला.
- २०२४ विधानसभा निवडणूक शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडून लढवली होती.
- महापालिकेत महापौर, पीएमपीएल संचालक, पक्ष वेगळे झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम करत होते.
- हडपसर विधानसभा मतदारसंघात प्रशांत जगताप यांचा चांगला संपर्क आहे.
- सध्याची परिस्थिती पाहता प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये गेल्याने एक चांगला नेता मिळेलच, सोबत काँग्रेसची ताकद ही वाढेल, असे म्हटले जात आहे.
- प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये गेल्याने हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला याचा फटका बसणार आहे.
- प्रशांत जगताप यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे एकमेव ताकदीचा नेता होता. प्रशांत जगताप यांच्यासारखा कोणीही नेता सध्यातरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे नाही, असे म्हटले जात आहे.