कॅटरिंगच्या कामाचे पैसे वारंवार मागणाऱ्याची हत्या; आरोपी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 21:34 IST2018-07-05T21:33:40+5:302018-07-05T21:34:14+5:30
दोन दिवसांपूर्वी कार्टर रोड समुद्रकिनारी सापडला होता मृतदेह

कॅटरिंगच्या कामाचे पैसे वारंवार मागणाऱ्याची हत्या; आरोपी अटकेत
मुंबई - कॅटरिंगच्या कामाचे पैसे वारंवार मागणाऱ्या तरुणाच्या हत्येचा उलघडा खार पोलिसांनी केला असून आरोपी रोहित अंबुरे याला सोलापूर येथून अटक करण्यात आली. खून झालेल्या इसमाचा मृतदेह दोन दिवसांपूर्वी खार येथील समुद्रकिनारी खारपुटीच्या झुडूपात आढळून आला होता.
कार्टर रोड येथील समुद्रकिनारी खारपुटीच्या झुडुपात सापडलेल्या अज्ञात इसमाची ओळख पटली असून बलदीप ऊर्फ नारायण मुलचंद गुप्ता (२५) असे मयत इसमाचे नाव आहे. या इसमाचा मृतदेह २ जुलै रोजी आढळून आला होता. या प्रकरणी मृतदेहावर काही खुणा दिसून आल्याने खार पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. घटनास्थळावर मिळालेल्या परिस्थितीजन्य पुरावे व खबऱ्यांच्या माहितीवरून पोलीस पथके पाठवण्यात आली. सोलापूर येथे रवाना झालेल्या पोलीस पथकाला आरोपीचा माग लागला. कॅटरिंगच्या कामाचे पैसे मयत बलदीप हा वारंवार मागत असल्याच्या कारणावरून आरोपीने त्याच्यावर चाकूने वार करून हत्या केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. या तपासकामी खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे, पांडुरंग लोणकर, सचिन काटकर, सहाय्य्क पोलीस निरीक्षक राजकुमार पोवार, भिमसेन गायकवाड आदींना अथक परिश्रम घेतले.