समृध्दी महामार्गाच्या वृक्ष लागवडीत खो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 06:33 PM2020-11-26T18:33:29+5:302020-11-26T18:34:00+5:30

Tree planting : ६७८ कोटी रुपयांच्या निविदा रद्द

Kho in Samrudhi Highway tree planting | समृध्दी महामार्गाच्या वृक्ष लागवडीत खो

समृध्दी महामार्गाच्या वृक्ष लागवडीत खो

Next

मुंबई : नागपूर – मुंबई समृध्दी महामार्गावर तब्बल ६७८ कोटी रुपये खर्च करून वृक्ष लागवड करण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने ( एमएसआरडीसी ) १५ पँकेजमध्ये काढलेल्या निविदा रद्द केल्या आहेत. या कामासाठी प्री बिड क्वाविफिकेशनची ( निविदा पूर्व पात्रता) अट समाविष्ट केली जाणार आहेत. त्यात पात्र ठरणा-या कंपन्याच या कामाची निविदा भरू शकतील अशी माहिती विश्वसनीय सुत्रांकडून हाती आली आहे.

१० जिल्ह्यातून जाणा-या आणि ५५ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या समृध्दी महामार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या महामार्गापैकी नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा डिसेंबर, २०२१ पर्यंत सुरू करण्याचे नियोजन आहे. रस्ता वाहतूकीसाठी खुला करण्यापूर्वी रस्त्याच्या दुतर्फा सुमारे १२ लाख ६८ हजार ३४६ वृक्षांची लागवड केली जाणार आहे. या व्यतिरिक्त महामार्गाच्या मधोमध १२ लाख ८७ हजार ३२० छोट्या वनस्पती आणि संरक्षक भिंतीच्या आत ३ लाख २१ हजार ८०३ बांबूंची लागवड करण्याचे नियोजन आहे. मार्गिकांच्या दोन्ही उतारांवर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार हरित पट्टाही निर्माण केला जाणार आहे. ही कामे १५ पँकेजमध्ये विभागण्यात आली असून सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. ३१ आँक्टोबरपर्यंत ती प्रक्रिया पूर्ण होईल आणि पात्र कंत्राटदारांची निवड होईल अशी अपेक्षा होती. मात्र, ही सारी प्रक्रियाच एमएमआरडीएने रद्द केली आहे.

सर्वसाधारण निविदा प्रक्रियेत तांत्रिक आणि आर्थिक निकषाच्या आधारावर पात्र ठरणा-या निविदाकाराची निवड केली जाते. तर, प्री बिड क्वालिफिकेशनमध्ये पात्र ठरू शकतील अशा कंत्राटदारांची सुरवातीला निवड होते. त्यानंतर त्यांना आर्थिक बोली लावण्यासाठी निविदा काढल्या जातात. त्याल लघुत्तम ठरणा-या निविदाकाराची निवड कामांसाठी केली जाते. या निविदा ई टेंडरींगने काढल्या जात असल्या तरी अंतिम प्रक्रियेत कोण बोली लावणार हे पूर्वनियोजत असते. या प्रक्रियेत पध्दतशीरपणे लाँबींग होते असा संशय आहे. परंतु, त्यात तथ्य नसून अनेक मोठ्या कामांमध्ये ही पद्धत अवलंबली जात असल्याचे सांगितले जात आहे.   

येत्या आठवड्यात सुधारित निविदा

निविदा रद्द केल्याच्या वृत्ताला एमएसआरडीसीच्या एका वरिष्ठ अधिका-याने दुजोरा दिला आहे. प्री बिड क्वालिफिकेशनचा निकष नव्या प्रक्रियेत समाविष्ट केला जाणार की नाही याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. त्याबाबतचा साधाक बाधक चर्चेनंतर निर्णय घेतला जाईल. येत्या आठवड्याभरात सुधारित निविदा काढल्या जातील अशी माहितीसुध्दा या अधिका-याने दिली. तसेच, निविदा ई टेंडरींग पद्धतीने काढली जाणार असल्याने त्यात संशयाला वाव नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. 

Web Title: Kho in Samrudhi Highway tree planting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.