मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 06:01 IST2025-08-15T05:58:22+5:302025-08-15T06:01:14+5:30

बीडीडी चाळीच्या ५५६ सदनिकांचे रहिवाशांना चावीवाटप

Keys of 556 flats in the first phase of the BDD Chawl Rehabilitation Project were distributed by CM Devendra Fadnavis | मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुंबईतील बीडीडी चाळींचा जसा सुसज्ज आणि आधुनिक पद्धतीने पुनर्विकास करण्यात आला, तसाच दर्जेदार पुनर्विकास आता धारावीचाही होणार आहे. दहा लाख लोकसंख्या असलेल्या धारावीचे रूपांतर एका नव्या, सुसज्ज शहरात करण्यात येणार आहे. येथील प्रत्येक पात्र कुटुंबाला घर मिळणारच आहे. मात्र, मुंबईत घरांची किंमत आज सोन्यासारखी आहे. ही घरे विकू नका, ती पुढच्या पिढीला द्यायची आहेत, हे लक्षात ठेवा. घराच्या मालकीत लाडक्या बहिणीचे नावही जरूर जोडा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केले.

माटुंग्याच्या यशवंत नाट्यमंदिरात वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील ५५६ सदनिकांची चावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी वितरित करण्यात आली. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात १६ लाभार्थीना चावी वाटप करण्यात आले.

महायुती सत्तेत आल्यानंतर बीडीडी चाळवासीयांच्या मागण्या पूर्ण करण्याची संधी आली. विकासकांचा उद्देश फक्त विक्रीसाठी जास्त फ्लॅट मिळवणे हा असल्याने प्रकल्प रेंगाळले. त्यामुळे 'म्हाडा' लाच विकासक बनवून ५०० चौरस फुटांचे फ्लॅट देण्याचा निर्णय घेतला. अभ्युदयनगर, अंधेरीतील प्रकल्प, जे.बी. नगर हे प्रकल्पही 'म्हाडा'च करणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

एकाच गाडीमधून केला प्रवास

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी चावी वितरण कार्यक्रमाआधी वरळी येथील नव्या घरांची पाहणी केली. म्हाडा अधिकाऱ्यांकडून त्यांनी प्रकल्पाची माहिती घेतली. यानंतर हे तिघेही नेते एकाच गाडीतून यशवंत नाट्य मंदिराच्या दिशेने निघाले. अजित पवार हे पुढच्या तर शिंदे आणि फडणवीस मागच्या सीटवर बसले होते.

दीड वर्षात एकही खड्डा दिसणार नाही : शिंदे

मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकराला पुन्हा मुंबईत आणायचे बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प हे उदाहरण आहे. गिरणी कामगारांनाही एक लाख घरे देत आहोत. पोलिसांची घरे ५० लाखांवरून १५ लाखांवर आणली. महायुतीने केवळ विकास हाच अजेंडा ठेवला असून मुंबई एमएमआरमध्ये मोठी कामे होत आहेत. पुढील दीड वर्षात मुंबईत एकही खड्डा दिसणार नाही, असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

मोहाला बळी पडू नका : अजित पवार

वर्ष १९९१ पासून काम करताना अनेक सरकारी कामांचे उ‌द्घाटन केले. कन्स्ट्रक्शन कसे केले हे निरखून पाहतो; परंतु बारकाईने पाहणी करूनही वरळी प्रकल्पात एकही चूक सापडली नाही. वरळीकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण होत आहे. बीडीडी चाळ म्हणजे मिनी भारत २ आहे. हे तुमचे हक्कच घर असून कोणत्याही मोहाला बळी पडू नका. आता धारावीचे देखील काम असेच करून दाखवणारच आहोत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

व्यासपीठावर कोण?

उपसभापती डॉ. नीलम गो-हे, कोशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, राज्यमंत्री पंकज भोयर, नगर विकासचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता, म्हाडा मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, म्हाडा दुरुस्ती मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर, राज्यसभा खासदार मिलिंद देवरा, आ. सचिन अहिर, आ. महेश सावंत, आ. सुनील शिंदे, माजी आमदार किरण पावसकर, माजी आमदार सदा सरवणकर, शिंदेसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन. सी. आदी उपस्थित होते.
 

Web Title: Keys of 556 flats in the first phase of the BDD Chawl Rehabilitation Project were distributed by CM Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.