Keep the problem away from the sister !; WhatsApp message goes viral | बहिणीपासून समस्या दूर ठेव!; भावोजीचा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज व्हायरल

बहिणीपासून समस्या दूर ठेव!; भावोजीचा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज व्हायरल

मुंबई : सुशांतसाठी त्याचे भावोजी ओ.पी. सिंग यांनी पाठवलेले व्हॉट्सअ‍ॅप मेसेज व्हायरल झाले आहेत, जे त्यांनी सुशांतचा रूममेट सिद्धार्थ पिठाणी याच्या मोबाइलवर पाठवले होते. यात सुशांतला त्याच्या समस्या बहिणीपासून दूर ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला होता.

सिद्धार्थने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटनुसार, ‘माझ्या पत्नीला (सुशांतची बहीण) तुझ्या समस्यांपासून दूर ठेव. या सर्वाला तुझी संगत, तुझ्या आसहाय्य तसेच चुकीच्या सवयी, गैरव्यवस्थापन जबाबदार आहे. त्यामुळे माझ्या पत्नीच्या चांगुलपणाची किंमत तिला मोजावी लागू नये,’ असे सिंग यांनी सुशांतसाठी फेब्रुवारी, २०२० मध्ये पाठवलेल्या मेसेजमध्ये नमूद आहे. सुशांत मनाने हळवा असल्याचे समजते. त्यामुळे भावोजीच्या अशा मेसेजमुळे त्याच्या मनावर आघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे मानसोपचारतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

जीवाला धोका असल्याचा पाठवला होता मेसेज
परिमंडळ ९ चे तत्कालीन पोलीस उपायुक्त परमजीतसिंह दहिया यांना व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवत सुशांतच्या जीवाला धोका असल्याची माहिती देण्यात आल्याचे सिंग यांचे म्हणणे आहे. मात्र याबाबत लेखी तक्रार करण्याची विनंती करूनही कुटुंबीयांनी ती दिली नसल्याचे मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

राजकारण तापले; आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी
अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची आत्महत्या नसून हत्या आहे. राज्य सरकार कोणाला तरी वाचवायचा प्रयत्न करत आहे. सुशांतसिंहची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या आत्महत्येची पोलिसांनी चौकशी का केली नाही? बलात्कार करून तिला ठार मारण्यात आले आहे, असे खळबळजनक आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पत्रपरिषदेत केले.

त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव पर्यारवणमंत्री आदित्य ठाकरे यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले. सुशांतसिंह आत्महत्येविषयी कोणाकडे काही विशेष माहिती असेल, तर त्यांनी ती पोलिसांनाच दिली पाहिजे. पोलीस नक्कीच त्या दिशेने तपास करतील. मी संयमाने वागत आहे, मात्र अशा प्रकारे चिखलफेक करून सरकार, ठाकरे परिवाराला बदनाम करता येईल, या भ्रमात कोणीही राहू नये, असे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी माझ्यावर आणि ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. ही एक प्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखी आहे. या प्रकरणाशी आपला काडीमात्र संबंध नाही, असे स्पष्टीकरण दिले.

आदित्य यांचे निवेदन प्रसिद्ध होण्यापूर्वी माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी टिष्ट्वट केले. ‘रहते है शीश महलो मे जो, वो आवाम से दूरी बनाया करते है... मगर हम वो शक्स हे, जो पथ्थरों के घर बनाया करते है... भूल गए है वो कांच के घर में रहकर खुद, छुपाये कुछ नही छूपता...! हम फरेबियोंको ठोकरों में, सच को सीने से लगाया करते है...’ असे त्या म्हणाल्या.

काँग्रेसकडून पाठराखण
राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी तपास सीबीआयकडे द्यावा, असे पत्र दिलेले असताना, युवा काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांनी आदित्य ठाकरे यांची बाजू घेतली. आपण चांगले काम करत आहात. त्यामुळे आरोप होत आहेत. याकडे लक्ष देऊ नका, असे म्हणाले.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Keep the problem away from the sister !; WhatsApp message goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.