लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : '३-३-२०२५ को राजीनामा होगा', असे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहित धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार असल्याचा दावा त्यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी केला आहे.
मी ५ मार्चपासून धनंजय मुंडेंविरोधात उपोषण करणार होते. पण मला सूत्रांनी माहिती दिली की तुम्ही उपोषणाला बसू नका. दोन दिवस आधीच अजित पवारांनी धनंजय मुंडेंकडून राजीनामा लिहून घेतला आहे. सोमवारी राजीनामा सादर होईल. मुंडे राजीनामा देत नव्हते. पण पवारांनी राजीनामा लिहून घेतला. सोमवारी अधिवेशन आहे, त्याआधी सगळ्यांसमोर राजीनामा दिल्याचे जाहीर होईल, असा दावा करुणा यांनी माध्यमांशी बोलताना केला. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. मी त्यांची वेळ मागितली आहे, असेही त्या म्हणाल्या.
दमानियांचे पुढचे पाऊल
करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दावा कसा केला? त्यांच्या माहितीचा स्रोत काय आहे? हे मला माहित नाही. राजीनामा नाही झाला तर माझे पुढचे पाऊल काय असणार आहे, हे मी उद्या जाहीर करेन, असा इशारा अंजली दमानिया यांनी दिला.
मुंडे अजिबात राजीनामा देणार नाहीत. सरकारची ८० दिवस बदनामी होत आहे तरी या लोकांना काही फरक पडत नाही. आम्ही सांगत होतो हा वाल्मीकच गुन्हेगार आहे, तेव्हा मुंडे सागंत होते वाल्मिक माझा खास माणूस आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावाच लागेल, कारण त्यांच्या जवळच्या माणसाला देशमुख हत्येप्रकरणातील सूत्रधार असल्याचे आरोपपत्रात सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला नाही तर विधिमंडळात त्याचे पडसाद उमटतील, असे याबाबत बोलताना उद्धव सेनेचे नेते संजय राऊत म्हणाले.