‘महामुंबई कबड्डी’ रंगणार! 15 ते 21 जानेवारीदरम्यान मुंबईत कबड्डीचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 07:10 AM2018-01-05T07:10:45+5:302018-01-05T07:12:51+5:30

राज्यातील धडाकेबाज, होतकरू आणि उदयोन्मुख खेळाडूंच्या झंझावाती चढाया-पकडींचा  खेळ येत्या 15 ते 21 जानेवारीदरम्यान अभिनव कलाक्रीडा अकादमी आणि ओएच मिडियाच्या आयोजनाखाली कांदिवलीच्या चारकोप येथील विशाल सह्याद्री क्रीडानगरीत पाहायला मिळेल.

Kabaddi thrills in Mumbai between 15 and 21 January | ‘महामुंबई कबड्डी’ रंगणार! 15 ते 21 जानेवारीदरम्यान मुंबईत कबड्डीचा थरार

‘महामुंबई कबड्डी’ रंगणार! 15 ते 21 जानेवारीदरम्यान मुंबईत कबड्डीचा थरार

Next

मुंबई - राज्यातील होतकरू आणि उदयोन्मुख खेळाडूंचा  खेळ येत्या 15 ते 21 जानेवारीदरम्यान अभिनव कलाक्रीडा अकादमी आणि ओएच मिडियाच्या आयोजनाखाली कांदिवलीच्या चारकोप येथील विशाल सह्याद्री क्रीडानगरीत पाहायला मिळेल. या दिमाखदार कबड्डीचा आवाज महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना आणि मुंबई उपनगर कबड्डी संघटनेच्या साहाय्याने घुमणार आहे.

प्रो कबड्डीमुळेच गल्लीबोळातली अस्सल मराठी कबड्डी लोकप्रियच नव्हे तर ग्लॅमरस झाली. आशियाई खेळांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेली कबड्डी प्रो कबड्डीमुळे खऱया अर्थाने आंतरराष्ट्रीय झाली. त्याच प्रो कबड्डीत महाराष्ट्राच्या खेळाडूंचे नाव अभिमानाने घेतले जावे, प्रो कबड्डीला राज्यातून दमदार-जोरदार खेळाडू मिळावेत, प्रो कबड्डीमध्ये मराठी मुलांना संधी मिळावी,त्यासाठी  त्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याकरिता मंच मिळावा या उदात्त हेतूनिशी कबड्डीची काशी असलेल्या मुंबईत नववर्षाला महामुंबई कबड्डी लीग या दर्जेदार स्पर्धेचा धमाका केला जाणार आहे.

 राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचे खेळाडू नेमके का मागे पडतात? की त्यांना न्याय मिळत नाही ? हल्ली असे प्रश्न वारंवार विचारले जातात. याचे उत्तरही शोधावयाचे आणि खेळाडूंना आपला दर्जा सिद्ध करण्याची संधी द्यावयाची असा दुहेरी उद्देश महामुंबई कबड्डीच्या आयोजनातून साध्य करण्याचा आयोजकांचा मानस आहे. आमच्या खेळाडूंना मॅटवरील तंत्र समजून घेऊन ते विकसित करणे या स्पर्धेचा आणखीन एक महत्त्वपूर्ण उद्देश आहे. महाराष्ट्रातील कबड्डीचा तांत्रिक पाया पक्का व्हावा यासाठी आम्ही हा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत, अशी भूमिका अभिनव कला क्रीडा अकादमीचे सर्वेसर्वा अंकुश मोरे यांनी मांडली. महामुंबई कबड्डी लीगच्या बोधचिन्हाचे औपचारिक उद्घाटन करताना स्पर्धेच्या सहा संघाच्या कर्णधारांचीही ओळख करून देण्यात आली. लवकरच सहा संघाच्या नावांची घोषणा करण्यात येणार असून राजू लोहार, आरिफ सय्यद, हरिदास भायदे, रोहित जाधव, शैलेश गारले आणि नामदेव इस्वलकर यांच्याकडे नेतृत्व सोपविण्यात आले. या कार्यक्रमाला स्पर्धेचे संयोजक आणि शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते रवि करमरकर, हनुमंत सावंत, दिपक जाधव, दत्ता पाटील, सुनील देसाई आणि सुनील सुवर्णा हे कबड्डीचे संघटक उपस्थित होते.

 1200 खेळाडूंमधून संघांची निवड

प्रो कबड्डी लीगच्या धर्तीवर खेळविल्या जाणाऱया महामुंबई कबड्डीच्या सहा संघांची निवडही 1200 खेळाडूंच्या चाचणी स्पर्धेतून केली गेली. या चाचणीसाठी मुंबई, उपनगर, ठाणे, नवी मुंबईतून खेळाडू आले होते.त्यातून 100 खेळाडूंची निवड करण्यात आली असून आता त्यातूनच 12 खेळाडूंचे सहा संघ तयार केले जातील आणि उर्वरित खेळाडूंना राखीव ठेवले जाईल. प्रत्येक संघात 9 स्थानिक आणि 3 अन्य जिल्हयातील खेळाडूंची निवड करता येईल. प्रो कबड्डीप्रमाणे महामुंबई कबड्डीतही संघाचे मालक असतील. तेच खेळाडूंचा सर्व खर्च उचलतील. या स्पर्धेच्या तयारीसाठी 7 दिवसांचे सराव शिबीरही आयोजित केले जाणार असून या शिबीरात खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी अनेक कबड्डी दिग्गजांना आमंत्रित करण्यात आले आहे. ही स्पर्धा साखळी आणि बाद फेरीत खेळली जाणार असून एकूण 17 सामने खेळले जातील. गटात अव्वल राहणाऱया पहिल्या दोन संघांमध्ये महामुंबई कबड्डी लीगचा अंतिम सामना खेळला जाईल तर तिसऱया क्रमांकासाठी गटातील तिसऱया आणि चौथ्या क्रमांकाच्या संघांमध्ये झुंज रंगेल.

 

Web Title: Kabaddi thrills in Mumbai between 15 and 21 January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.